मुंबईतील कार्यक्रमात आज उत्साहात अनावरण; राजघराण्याची प्रमुख उपस्थिती…
सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.०८: संस्थानकालीन उज्वल परंपरा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानाच्या “गंजिफा” कलेला भारताच्या पोस्ट तिकिटावर झळकण्याचा मान मिळाला आहे. त्यात दशावतार कलेचा सन्मान करण्यात आला आहे. आज हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी सावंतवाडी संस्थांनचे राजे खेम सावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले उपस्थित होते.
याबाबतची माहिती सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिली. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात प्रथमच चौकोनी असलेले पोस्ट कार्ड गोल स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात सावंतवाडीच्या प्रसिद्ध अशा गंजीफाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता गंजीफाच्या स्वरूपात असलेला पोस्ट कार्ड देशात आणि परदेशात जाणार आहे. त्या माध्यमातून सावंतवाडीची गंजिफा कला आता साता समुद्रा पार जाणार आहे. ही आमच्यासाठी कौतुकाची बाब आहे. आज मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. आम्ही सर्व राजघराण्यातील लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. नव्या पोस्टकार्डवर दशावताराचे गंजिफाचे सादरीकरण करण्यात आले आहे. या कलेला प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दशावताराला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, असे ते म्हणाले.