बांदा,ता.०८: महिलांचे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणारा दिवाळी फराळ प्रशिक्षण उपक्रम नुकताच बेळगाव येथे यशस्वीपणे पार पडला. कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री प्रभू विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्था, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एस. पी. एम. रोडवरील विश्वकर्मा मनु-मय संस्थेच्या सभागृहात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
दीपप्रज्वलन करून आणि विश्वकर्मा देवाचे स्मरण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये विश्वकर्मा संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सुतार, सचिव किशोर कणबरकर, संचालक महादेव तोंडकर, विनायक देसाई, महिला मंडळाच्या व्हाइस प्रेसिडेंट रंजना मोदगेकर, सुवर्ण कर्नाटक मानव अधिकार जिल्हाध्यक्ष सुनीता सुभेदार, तसेच प्रदीप सुतार, प्रसन्ना लोहार, धर्मा लोहार आणि प्रशिक्षक अर्चना व उज्वला पाटील यांचा समावेश होता.
या प्रशिक्षणात महिलांना अकरा प्रकारच्या पारंपरिक दिवाळी फराळ पदार्थांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. एकूण २७ महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थींनी मनोगतातून या उपक्रमामुळे त्यांना आत्मविश्वास, प्रेरणा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विश्वकर्मा संघाचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज व्यक्त केली. महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा, यासाठी संस्थेच्या सभागृहाचा वापर विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हा उपक्रम एक प्रभावी पाऊल असल्याचे मत कोकण संस्थेच्या श्रीदेवी दंडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा प्रशिक्षण उपक्रम म्हणजे महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे टाकलेले एक सक्षम पाऊल ठरले.