आंबोली,ता.०९: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सहकाररत्न कै. पी.एफ. डॉन्टस यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एस.एन. पोतदार यांनी डॉन्टस यांच्या कार्याचा आढावा घेतला. डॉन्टस यांचे पुत्र आणि सैनिक स्कूलचे सचिव जाॅय डाॅन्टस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डाॅन्टस हे व्हिजनरी व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी पाहिलेली सर्व स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संस्था अध्यक्ष सुनील राऊळ यांनी त्यांच्या अनेक वर्षे काम करण्याचे भाग्य लाभले, असे सांगत, त्यांच्या स्वप्नांना आणि विचारांना भव्यदिव्य स्वरूप देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच सैनिक स्कूलच्या प्रगतीसाठी संपूर्णपणे झटेन, अशी ग्वाही दिली. सैनिक बँक चेअरमन बाबुराव कविटकर, माजी प्राचार्य एस.टी. गावडे, आयईसएलचे माजी अध्यक्ष सुभेदार शशिकांत गावडे यांनी देखील त्यांच्या कार्याचा आढावा दिला.
याच दिवशी भारतीय हवाई दलाचा ९३ वा ‘हवाई दल दिन’ साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून कै. पी.एफ. डॉन्टस यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी हवाई दलातील विविध विमानांची आणि मॉडेल्सची प्रतिकृती बनवली. विद्यार्थ्यांनी बी २ बाॅबर, रॅफल, सुरवोई ३० एमकेआय, सुरवोई ५७, एम. आय. जी. २१, एम.आय.जी. २९, स्पेसकॅट जग्वार अशा दर्जेदार प्रतिकृती बनवून सर्वांना भारतीय हवाई दलाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. कॅडेड प्रज्वल यादव, वेदांत वातकर, हर्ष वळंजू, अर्णव कासार, दुर्वेश कोटनाके, सर्वेश गावडे, जयेश धुरी, सिद्धांत देसाई, रुद्र बर्वे, अथर्व राठोड, अमेय पवार, अरमान कादिरी, दत्ताराम शेलार या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी ज्येष्ठ संचालक शिवाजी परब, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर, सुभेदार शशिकांत गावडे, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी सैनिक पतसंस्था प्रल्हाद तावडे, माजी प्राचार्य एस.टी. गावडे, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, प्राचार्य एन.डी. गावडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंबीरराव आडकूरकर यांनी केले, तर प्राचार्य एन.डी. गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.