बांदा, ता.०९: येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध अधिक दृढ केले.
बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ज्येष्ठ नागरिक अन्वर खान, शंकर नार्वेकर, शामकांत काणेकर यांच्यासह उपसरपंच आबा धारगळकर, अरूण मोर्ये, महादेव वसकर, उमांगी मयेकर, भक्ती मुळीक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. ज्यामुळे वातावरण भावनिक आणि उत्साही झाले होते. भविष्यात शाळेसाठी आणि माजी विद्यार्थ्यांच्या समन्वयासाठी पाऊल टाकत या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेसाठी सदस्य निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले. तर प्रास्ताविक जे.डी. पाटील यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार उदय सावळ यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.