सावंतवाडी,ता.०९: येथील बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एक स्तुत्य उपक्रम राबवला. मंडळाने जमवलेले अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू पणदूर येथील संविता आश्रमाला भेट म्हणून देण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या काळात मंडळाने विविध उपक्रमांतून हे धान्य आणि साहित्य जमा केले होते. हे सर्व साहित्य गरजूंना मिळावे या उदात्त हेतूने मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मंडळाच्या सदस्यांनी एकत्रितपणे सविता आश्रमात जाऊन हे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या सामाजिक कार्याबद्दल बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्सव फक्त मनोरंजनासाठी नसून, समाजातील दुर्बळ घटकांना मदत करण्यासाठीही त्याचा उपयोग व्हावा, असा संदेश या कृतीतून मंडळाने दिला आहे.