मालवण, ता. ९ : सुकळवाड ग्रामसचिवालय येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली. अभियानाच्या विविध उद्दिष्टांवर विचारमंथन करून ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गटनिहाय तयारी करण्यात आली. तयार केलेल्या गटांवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन अभियान प्रभावीपणे राबविण्याचा आणि निर्धारित वेळेत उद्दिष्टे पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला.
सुकळवाड येथील ग्रामसचिवालयामध्ये काल मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्तरीय विकास समितीची सभा उत्साहात झाली. या सभेमध्ये पंचायत समितीचे कक्ष अधीक्षक श्री. पळसंबकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठ मार्गदर्शक कृष्णा पाताडे, प्रकाश पावसकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत हे अभियान यशस्वी करण्याची दिशा निश्चित करण्यात आली. ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी यांनी उपस्थित सर्व समिती सदस्यांचे आभार मानले.