ठाकरे शिवसेना आक्रमक; वाहतूक नियंत्रकांना निवेदन…
बांदा,ता.०९: येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज बांदा बसस्थानक वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना युवासेना उपतालुकाप्रमुख रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, सुरक्षेअभावी निर्माण झालेली प्रवाशांची गैरसोय तसेच असामाजिक प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर या सर्व बाबींचा निवेदनात विशेष उल्लेख करण्यात आला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बांदा बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात; मात्र त्यांच्यासाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून प्रवाशांना उभे राहतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः सकाळी व संध्याकाळी महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बसस्थानक परिसरात काही तरुण विनाकारण वेळ घालवताना दिसतात. त्यांच्यावर तातडीने कारवाई करून परिसरात शिस्त प्रस्थापित करावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय बसस्थानक परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तातडीने पाहणी करून निष्क्रिय असलेले कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशीही मागणी करण्यात आली. अन्यथा या प्रकरणी उच्चस्तरावर तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून हे निवेदन देण्यात आले. यावेळी सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, विकी कदम, सदा राणे, साहिल खोबरेकर, अक्षर खान, राहुल माने आणि रंगनाथ मोटे आदी उपस्थित होते.