धनश्री मराठे; ग्रामस्थांना त्रास नको, वीज अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष…
सावंतवाडी,ता.२६: मळेवाड येथे सध्या २५ केव्हीचा कमी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र वीज टंचाई आणि कमी दाबाचा सामना करावा लागत आहे. विजेच्या या कमी दाबामुळे घरगुती व व्यावसायिक उपकरणांसह शेतीचे पंप चालवणे कठीण झाले आहे, तसेच ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाणी मिळणेही कठीण झाले आहे. या समस्येमुळे मळेवाडमधील मसूरकरवाडी, नाईकवाडी, हेदुलवाडी, सावळवाडी, केरकरवाडी, शिरसाटवाडी, चराटकरवाडी, मुरकरवाडी, परबवाडी आणि राणेवाडी या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी येथील ट्रान्सफॉर्मर बदलून तातडीने १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्या धनश्री हेमंत मराठे यांनी कुडाळच्या महावितरण कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


