महाविकास आघाडी सरकार टिकण्यासाठी राष्ट्रवादी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार…

7
2
Google search engine
Google search engine

अजित पवार; “त्या” विधानाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारू, बंडखोरांना शिवसैनिकच जागा दाखवतील…

मुंबई,ता.२३: राज्यात महाविकास आघाडी सरकार टिकण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमच्या पक्षाचा कायम पाठिंबा राहणार आहे. मात्र खासदार संजय राऊतांनी केलेल्या विधानाबाबत आम्ही थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक वेळा शिवसेनेत बंड झाले. यात केवळ नेते वेगळे झाले, मात्र शिवसैनिक आजही आपल्या जागी ठाम आहेत. त्यामुळे अशा बंडखोरांना शिवसैनिकच पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले. तर शिंदेंच्या बंडामध्ये सध्यातरी भाजपाचा कोणताही रोल दिसत नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्री. पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार टिकण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष पूर्णतः प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आमचा श्री. ठाकरे यांना शेवटपर्यंत पाठिंबा असणार आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या विधानाबाबत आम्ही थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारू असे त्यांनी सांगितले. तर निधी वाटपाबाबत होत असलेले आरोप चुकीचे आहे. तीनही पक्षांना समान न्याय देण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला आहे. त्यामुळे आताच्या घडीला टीकाटिप्पणी न करता तीनही पक्षांनी एकत्र येऊन सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, शिवसेनेत अनेकदा बंड झाले. यात केवळ नेते पक्षापासून वेगळे झाले. मात्र शिवसैनिक आजही आपल्या जागी ठाम आहेत. तर बंड करणाऱ्यांना त्यांनी पराभवाची धूळ चारली , हा सुद्धा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आता बंडखोरी केलेल्या आमदारांना सुद्धा भविष्यात शिवसैनिकच त्यांची जागा दाखवतील, असा टोला लगावला. तर शिंदे यांनी केलेल्या बंडात सध्यातरी भाजपाचा कोणताही रोल दिसत नाही, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.