शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचे ‘मिशन लोटस’…

4
2
Google search engine
Google search engine

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा तीन दिवसांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

कणकवली,ता.०९: आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिवसेनेच्या ताब्‍यात असलेल्‍या लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्‍याअनुषंगाने ‘लोकसभा प्रवास योजना’ आखण्यात आली आहे. यात केंद्रीय गृहराज्‍यमंत्री अजयकुमार मिश्रा हे ११ ते १३ ऑगस्ट या तीन दिवसांत ‘रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग’ लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत.

भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेची माहिती लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार आणि लोकसभा मतदार संघाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी आज येथील भाजप कार्यालयात दिली.

श्री.काळसेकर म्‍हणाले, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे ११ ऑगस्ट रोजी गोवा मुक्ती संग्राम हुतात्मा स्मारक पात्रादेवी येथून सकाळी दहा वाजता भाजप युवा मोर्चाच्या मोटरसायकल रॅलीतून सिंधुदुर्गात प्रवेश करणार आहेत. बांदा येथे श्री देव बांदेश्वर मंदिरात ते दर्शन घेणार आहे. त्यानंतर कुडाळ महालक्ष्मी हॉलमध्ये कोअर कमिटीची बैठक होईल त्याला ते मार्गदर्शन करतील, याच ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक होईल त्यानंतर सायंकाळी ३.१५ वाजता कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच ,उपसरपंच अशा प्रमुख लोकप्रतिनिधींचा मेळावा आणि संवाद कार्यक्रम होईल. सायंकाळी साडेपाच वाजता मालवण सिंधुदुर्ग किल्ला जीटी येथे नारळी पौर्णिमा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मिश्रा सहभागी होतील. त्यानंतर राणे कुटुंबीयांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद होईल. रात्री नीलम कंट्री साईट हॉटेल कणकवली येथे त्यांचा मुक्काम असेल.

१२ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गोठणे येथील मागासवर्गीय कुटुंबाच्या घरी केंद्रीय मंत्री विजय कुमार मिश्रा भेट देतील. त्यानंतर लांजा येथे पोलीस लाईन हॉलमध्ये सामाजिक कार्यकर्ते ,सहकारातील कार्यकर्ते, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा संवाद कार्यक्रम सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत होईल. लांजा तहसीलदार गोडावून येते रेशन धान्य दुकानाची भेट देऊन त्यांच्या समस्या ते जाणून घेतील. दुपारी साडेबारा वाजता देवरुख येथे लक्ष्मी मंगल कार्यालय येथे नव्या मतदारांशी संवाद केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा साधणार आहेत. सायंकाळी चार वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. तर साडेपाच वाजता रत्नागिरी भाजपा जिल्हा कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर ते माहिती देणार आहेत. साडेसहा वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृहावर वकील,डॉक्टर,उद्योजक व विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींबरोबर संवाद साधणार आहेत. शासकीय विश्राम गृह रत्नागिरी येथे त्यांचा मुक्काम असेल.

१३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत रत्नागिरी शहर मधील बुथ समिती सदस्य यांच्या समवेत संवाद होणार आहे. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे प्रस्थान करतील. साडेदहा वाजता कासार्डे येथे काथा उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाला ते भेट देतील. त्यानंतर अकरा वाजता कणकवली तालुक्यातील पियाळी गावाला भेट देतील. यावेळी मंडळ अध्यक्ष संतोष कानडे यांच्या निवासस्थानी ग्रामीण भागातील प्रभावशाली लोकांची ते भेट घेतील आणि संवाद साधतील. त्यानंतर साडेअकरा वाजता सिंधुदुर्ग ओरोस येथील इच्छापूर्ती सभागृहात केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी यांच्यासोबत चर्चा संवाद मेळावा होईल. दोन वाजता पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. पिंगळी गुढीपूर येथे ही भेट असेल. त्यानंतर तीन वाजता सावंतवाडी राजवाडा येथे बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक होईल. साडेचार वाजता सावंतवाडी मँगो हॉटेल येथे पत्रकार परिषद होईल व त्यानंतर केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा हे गोव्याकडे जाण्यास प्रस्थान करतील. असा तीन दिवसाचा लोकसभा प्रवास योजनेतील त्यांचा दौरा आहे. ही माहिती श्री जठार श्री काळसेकर यांनी दिली यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत,संयोजक मनोज रावराणे, सहसंयोजक संदीप साटम,जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.