गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज…

9
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गात जादा १९१ गाड्या येणार तर परतीच्या प्रवासासाठी १२७ गाड्यांची सज्जता…

कणकवली, ता.२४ : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई, उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्यांसाठी जादा १९१ गाड्या तर परतीच्या प्रवासासाठी १२७ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील विविध भागात जाणाऱ्या नियमित ९ गाड्याही सुरू असल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.
प्रकाश रसाळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे बसस्थानक येथे ब्रेक डाऊन व्हॅन कार्यरत असणार आहे. त्याशिवाय बांदा ते खारेपाटण या परिसरात फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत जादा वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

*’अशा’ सोडण्यात येणार जादा गाड्या*

२६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्गात जादा गाड्या येतील. यंदा चाकरमान्यांना घेऊन १९१ जादा गाड्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मुंबईवरून २६ ऑगस्टला २ गाड्या, २७ ऑगस्टला ८६ गाड्या, २८ऑगस्टला ४३ गाड्या, २९ ऑगस्टला ५४ गाड्या, ३० ऑगस्टला ६ गाड्या सिंधुदुर्गसाठी सोडण्यात येणार आहेत. तर त्यापैकी सावंतवाडी आगारात ८९, मालवण येथे १३, कणकवली ५९, देवगड १२, विजयदुर्ग १०, कुडाळ १, वेंगुर्ला ७ गाड्या येतील. या गाड्यांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते.

*परतीच्या प्रवासासाठी १२७ गाड्या*

याखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने प्रवाशांची उपलब्धता तसेच भारमान लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावांत जादा बस सोडल्या जाणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गातून मुंबई तसेच विविध भागात जाण्यासाठी १२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी ५४ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. अजून ७३ गाड्या उपलब्ध आहेत. ४ ते ११ सप्टेंबर याकालावधीत त्या गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत. या व्यतिरिक्त ९ नियमित गाड्या परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार परतीच्या प्रवासासाठी आणखीन गाड्याही वाढविल्या जाणार आहेत.

*रेल्वेच्या वेळापत्रकानुसार लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार*

रेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्रुप बुकिंगही सुरू आहे.

*महामार्गावर आणखीन दोन पेट्रोल पंपांची व्यवस्था*

मुंबईवरून येणाऱ्या गाड्यांना डिझेल पुरवठा सध्या सुरू असलेल्या पंपावरूनच होईल. तसेच महामार्गावर आणखीन दोन पेट्रोल पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, झाडे -झुडपे तोडण्यासाठी संबधित विभागांना कळविण्यात आले आहे. असेही रसाळ यांनी सांगितले.