सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हृदयरोग तज्ञ द्या…

5
2
Google search engine
Google search engine

देव्या सूर्याजी;आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री व जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन…

सावंतवाडी,ता.१०: येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ.अभिजीत चितारी यांनी राजीनामा दिल्यामुळे हृदयरोग तज्ञा अभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. यात अनेकांना जीव गमवावे लागत आहेत.
त्यामुळे रुग्णालयात कायमस्वरूपी हृदयरोग तज्ञ देण्यात यावा, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे त्यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहेत.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेत असणारे डॉ. चितारी यांनी आपल्या कायमस्वरूपी सेवेतून राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांवर उपचार करण्यासाठी फिजीशीअन उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. नुसती हेळसांड नव्हे तर अनेकांना जीव गमवायची वेळ आली असून काहींनी गमावले आहेत . त्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत आपणास सर्वकाही ज्ञात आहे . गोवा बांबुळी शिवाय अन्य पर्याय गोरगरीब , सर्वसामान्य जनतेला उपलब्ध नाहीत . खासगी रुग्णालयात उपचार घेण शक्य नाही . त्यामुळे जीवाला मुकण हा एकमेव पर्याय जनतेसमोर शिल्लक राहिला आहे . यात ज्यांना आपण कुटुंबातील सदस्य समजता ते आपले सावंतवाडीतील भुमिपूत्र आहेत . केवळ डॉक्टर नाही , अन् उपचाराअभावी किड्यामुंग्यांसारखा त्यांचा जीव जात असल्यास यासारखं दुसरं दुर्दैव नाही . आपल्या माध्यमातून दिलेल्या निधीतून रूग्णालतील भौतिक सुविधा व आधुनिकीकरण होत आहे . यंत्र सामुग्री देखील आपण उपलब्ध करून देत आहात . परंतु , अत्यावश्यक फिजीशीअन डॉक्टरच उपलब्ध नसतील तर या भौतिक सुविधांचा काय उपयोग ? त्यामुळे या विषयाची गंभीर दखल घेत तातडीनं कार्यवाही करण्यात यावी , कायमस्वरूपी एम.डी. फिजीशीअन उपलब्ध करून देण्यात यावा, असे म्हटले आहे.