मुंबईत “प्रमोशन” करण्यामागे नेमका “सूत्रधार” कोण याचा शोध घेण्याची केसरकरांना गरज….  

8
2
Google search engine
Google search engine

पुंडलिक दळवी; हृदयरोगतज्ञ देणे जमत नसेल, तर शवागृह तरी सुस्थितीत करण्याची मागणी…

सावंतवाडी,ता.२५: मुंबईचे पालकमंत्री पद देऊन दीपक केसरकर यांचे कोणीतरी प्रमोशन केले आहे, असा टोला लगावत यामागे नेमका सूत्रधार कोण ? याचा केसरकरांनीच शोध घ्यावा, आणि त्यापेक्षाही जिल्हा सोडून अन्य जिल्ह्याची जबाबदारी दिली, कशी याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा चिमटा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी आज येथे काढला. दरम्यान या ठिकाणी सावंतवाडी शहरासह रुग्णालयातील अनेक प्रश्न आहेत. हृदयरोग तज्ञ नसल्यामुळे गोवा-बांबूळी शिवाय रूग्णांकडे पर्याय उरलेला नाही. तर शवागृह सुद्धा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे किमान मृतदेहांची हेळसांड थांबवायला ते तरी दुरुस्त करा, असे आवाहन करत नवनिर्वाचित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आता जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांकडे गाभीर्याने लक्ष द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. दळवी बोलत होते.

यावेळी हिदायतुल्ला खान, शहर अध्यक्ष देवा टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सायली दुभाषी, संतोष जोईल, बाबल्या दुभाषी, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते.

श्री. दळवी पुढे म्हणाले, येथील उपजिल्हा रुग्णालय वारंवार विविध समस्यांच्या गर्तेत आहे. रुग्णालयात उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार अपयशीच आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बांबूळी किंवा खाजगी रुग्णालयाचा सल्ला दिला जातो. मात्र नातेवाईकांची परिस्थिती नसल्यास त्यांच्याकडून स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयात रुग्ण ठेवत असल्याचे पत्र लिहून घेऊन, उपचार दिले जात आहेत. अशी नाराजी सुद्धा अनेकांनी आमच्याकडे व्यक्त केली. याकडे आता निदान पालकमंत्र्यांनी तरी आरोग्य यंत्रणेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. तर उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह गेले अनेक महिने बंद आहे. रुग्णांवर उपचार नको, निदान त्यांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी ते तरी दुरुस्त करावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, श्री. केसरकर यांनी मागच्या काही दिवसात शहरातील गल्लोगल्लीत दौरा केला. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निदर्शनास आल्याच असतील. त्या सोडविण्यासाठी त्यांनी आता तरी प्रयत्न करावे. येथील मोती तलावाच्या फुटपाथची अद्याप दुरुस्ती झाली नाही. त्याचा त्रास तलावा काठी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. तर फुटपाथ खचलेल्या परिसरातून जाताना रस्त्यावरून चालावे लागते. एखाद्या भरधाव वाहनाची धडक बसून अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. मात्र याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाहीत, अशी नाराजी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे सुद्धा तात्काळ लक्ष द्यावेत, अशी मागणी ही त्यांनी केली.