वेठबिगारी प्रथा व बालकामगार निर्मूलनासाठी तपासणी मोहीम हाती घ्या…

5
2
Google search engine
Google search engine

मनसेची मागणी; सरकारी कामगार अधिकारी सचिन कोल्हाळ यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी,ता.२९: वेठबिगारी प्रथा व बालकामगार निर्मुलनासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी सचिन कोल्हाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या वेठबिगार कामगारांच्या समस्येबाबत राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे शिष्टमंडळाने दुकाने व आस्थापना निरीक्षक रविराज हुंबे यांच्याशी चर्चा करून सरकारी कामगार अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मागील काही दिवसांपासून नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार उघडकीस येऊन लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय अशा आशयाच्या बातम्या विविध वर्तमानपत्रांद्वारे आलेल्या आहेत. ही बाब गंभीर असून पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे अतिशय भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं समूह उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं देखील नाही.त्यामुळे सिंधुदुर्गात अशा प्रकारे वेठबिगारीची उदाहरणे अस्तित्वात आहेत का? याचा छडा लावणे आवश्यक असून ह्या घटनांचा, वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने गांभीर्यपूर्वक व कमालीच्या सहानुभूतीने लक्ष देणे गरजेचे असून जिल्ह्यात बेकरी व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, हॉटेल्समध्ये लहान मुले काम करताना दिसून येतात. ती वेठबिगार आहेत की बालकामगार याची पडताळणी करण्यात यावी, बालकामगार व वेठबिगारी निर्मुलन फक्त कागदावरच जाहीर झाली आहे की काय याची शहानिशा करावी,वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात प्रबोधन व जनजागृती करावी. अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. वेठबिगार वा बालकामगार काम करताना कुठेही आढळल्यास जागच्या जागी धडा शिकवा. असे आदेश मा.राजसाहेब ठाकरेंनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना दिले असल्याने मनसे पदाधिकारी ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवून आहेतच मात्र प्रशासन म्हणून आपण देखील बेकरी व्यवसाय, बांधकाम व्यवसाय,हॉटेल्स आदि ठिकाणी तपासणी करण्याची जिल्ह्यात विशेष मोहीम घ्यावी. अशी सूचना मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. जिल्ह्यात कामगार अधिकारी पद रिक्त असून प्रभारी कामगार अधिकाऱ्यांशी चर्चा करून आस्थापनांची तपासणी केली जाईल. असे आश्वासन दुकाने व आस्थापना निरीक्षक रविराज हुंबे यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले.यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर,अमोल जंगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.