सागर मित्र पदांची तत्काळ नियुक्ती करा..

4
2
Google search engine
Google search engine

रविकिरण तोरसकर ; मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी…

मालवण, ता. ०३ : पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत ‘सागर मित्र’ पदावर तत्काळ नियुक्ती करा अशी मागणी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे कोकण संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या मत्स्य उत्पादनात भर घालण्यासाठी नीलक्रांती ही योजना सन २०१४ साली सुरू केली. या योजनेअंतर्गत सन २०१९ पासून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशभरात लागू केली. सुमारे वीस हजार कोटी रुपयांची व मच्छीमार तसेच मत्स्य शेतकरी यांना ४० ते ६० टक्के पर्यंत अनुदान असणारी अशी ही योजना अतिशय अल्प कालावधीत लोकप्रिय झाली. खारे, निमखारे व गोड्या पाण्यातील मत्स्य शेती, शोभिवंत मत्स्य पालन, मत्स्य व्यवसायातील सुविधांचे आधुनिकीकरण, खोल समुद्रातील मासेमारी, मच्छीमारांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर पायाभूत सुविधांसाठी असलेली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्य व्यवसायातील सर्व घटकास लाभदायक ठरत आहे.
ही योजना देशातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार व लाभार्थी यामधील दुवा म्हणून कंत्राटी पद्धतीवर सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात आली. सागर मित्र या पदावर स्थानिक बेरोजगार, परंतु मत्स्य व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक अर्हता असणाऱ्या युवक, युवतींची भरती करण्यात आली. सन २०२० ते २०२१ यादरम्यान नियुक्त सागर मित्रांनी अतिशय उत्कृष्टरित्या काम केले. योजने संदर्भात प्रशासकीय यंत्रणा व लाभार्थी यामध्ये समन्वय साधत इच्छुक व्यक्तींना, योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन तसेच प्रोत्साहित केले. परंतु सन २०२२- २३ या कालावधीत सागर मित्र या पदासाठी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसायात इच्छुक असलेल्या व्यक्तींना योजनेची माहीत व लाभ मिळविण्यात अडचणी येत आहेत. मत्स्य व्यवसाय खात्याकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या यांचा विचार करता पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सागर मित्र या पदावर तत्काळ नियुक्ती होणे गरजेचे आहे. तसेच या नियुक्ती मध्ये पूर्वी काम केलेल्या सागर मित्रांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सागर मित्र ही पदे तत्काळ भरती करावेत अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री, मत्स्यव्यवसाय कार्यालयाचे सचिव, आयुक्त यांच्याकडे श्री. तोरसकर यांनी केली आहे.