राजघराण्याने जपलेला समाजकार्याचा वारसा युवराजांनी पुढे न्यावा…

7
2
Google search engine
Google search engine

सुरेश प्रभू; सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ…

सावंतवाडी,ता.०९: संस्थान काळापासून राजघराणे आणि जनतेत अंतर राहिले नाही. नेहमीच त्यांनी समाजासाठी योगदान दिले आहे. हाच वारसा युवराजांनी सुद्धा पुढे न्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले. दरम्यान राजवाड्याचे दार आज पुन्हा एकदा चांगल्या कार्यासाठी उघडले गेले आहे. या ठिकाणी आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे पाय नक्कीच राजवाड्याकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आज श्री. प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी युवराज लखम भोसले, डॉ.अमेय देसाई, शरद चव्हाण, नकुल पार्सेकर, डॉ. राजेश नवंगुळा, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले, डॉ. राजशेखर कार्लेकर, भाजप कार्यकारिणी सदस्य पुखराज पुरोहित, अभिनव उषःकाल सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. संजय कोग्रेकर आदी उपस्थित होते.श्री. प्रभू पुढे म्हणाले, डॉक्टर हे आधुनिक काळातील देवदूत आहेत. त्यांच्या स्पर्शाने रुग्णांना संजीवनी मिळते. त्यामुळे राजघराण्याकडून घेण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या सेवेमुळे अनेकांना जगायचा नवा आधार मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना श्री. भोसले म्हणाले, लोकांची सेवा करण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे. त्याच माध्यमातून आज हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी घेतले जात आहे. यापुढेही असे लोकोपयोगी उपक्रम राबविले जातील, असे सांगत राजघराणे आणि जनता यांच्यातील मागील काही काळात तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.