सावंतवाडीत अवैध धंदेवाईकांची दहशत, शांत सुसंस्कृत शहरात हा प्रकार भूषणावह नाही…

49
2
Google search engine
Google search engine

संजू परब आरोप; आठ दिवसात अवैध प्रकार मोडीत काढा, अन्यथा पालकमंत्र्यांकडे तक्रार …

सावंतवाडी,ता.१०: पोलिसांचा दुर्लक्ष असल्यामुळे सावंतवाडीत अवैध धंदे करणार्‍यांची दहशत सुरू आहे. येत्या आठ दिवसात ती दहशत आणि गैरप्रकार पोलिसांनी मोडीत काढावे, अन्यथा दहा हजार सह्याची मोहीम राबवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार, असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ते संजू परब यांनी दिला. दरम्यान राजरोस आणि नाक्यानाक्यावर सुरू असलेले गैरप्रकार शांत आणि सुसंस्कृत शहराला भूषणावह नाही. त्यामुळे याबाबत आम्ही भविष्यात आक्रमक भूमिका घेणार असून अवैध धंदे आणि त्यांना पाठीशी घालणार्‍यांचे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
श्री. परब यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, केतन आजगावकर, अमित परब, अजय सावंत, दिनानाथ नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. परब यांनी सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या अवैध प्रकाराविरोधात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोंळके यांच्यावर जबाबदारी असलेल्या सावंतवाडीत गेले काही दिवस अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात दारू, जुगार, मटका यांच्यासह अमंली पदार्थ वाहतूक आणि विक्री करणार्‍यांची संख्या जास्त आहे. यावरच हा प्रकार थांबलेला नाही. या व्यावसायिकांवर पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे त्यांच्याकडुन दहशत सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार रोखण्याची मागणी भाजपाकडुन करण्यात येत आहे. याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच येत्या आठ दिवसात याबाबत योग्य ती कारवाई झाली नाही तर दहा हजार सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.