परतीच्या पावसात उभी पिके झाली आडवी…

4
2
Google search engine
Google search engine

भाताला कोंब येण्याची शक्यता; शेतकरी नुकसानीच्या भीतीखाली…

बांदा,ता.१६: मडुरा पंचक्रोशीत आज रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक काही ठिकाणी पूर्णत: जमीनदोस्त झाले तर उभ्या परिपक्व पिकाला कोंब येण्याची शक्यता आहे. मात्र कापणीची वेळ होऊन गेली तरीही अद्याप पावसाने विश्रांती घेतली नसल्याने संपूर्ण शेतात उभे असलेले परिपक्व भातपीक सडले आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍याला मदतीची अपेक्षा आहे.
यंदाच्या मोसमात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होता. दोन दिवसांपासून दुपारनंतर मडुरा, बांदा परिसरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी मडुरा पंचक्रोशीत परतीच्या पावसाचा जोर वाढला. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. कापणी योग्य झालेले भाताचे उभे पीक आडवे झाले. परिणामी भाताच्या लोंब्या गळून पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पंपाच्या साहाय्याने लावणी केली अन आता कापणी योग्य झालेले पीक मात्र परतीच्या पावसात नासधूस पावत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या पदरी निराशा आल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.