माजगाव येथील सोनबहावा गृह प्रकल्पात अज्ञाताकडून चोरी…

7
2
Google search engine
Google search engine

बंद बंगला फोडून आठ हजाराचा मुद्देमाल लंपास; सावंतवाडी पोलिसात गुन्हा…

सावंतवाडी,ता.२३: माजगाव येथील सोनबहावा गृहप्रकल्पात अज्ञाताने चोरी केली असून बंद बंगला फोडून आतील टीव्ही आणि इन्व्हर्टर मिळून सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याने लंपास केला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान त्या ठिकाणी प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी असलेल्या विश्वनाथ भिकनाथ गोसावी यांनी याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाता चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, गणेश कराडकर, आनंद यशवंते व बाबू तेली यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित बंगल्यातील मालक मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे गेले अनेक महिने तो बंगला बंद होता. दरम्यान प्रकल्पाची देखरेख करणारे श्री. गोसावी यांना संबंधित बंगला आज फोडलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानुसार त्यांनी याबाबतची खबर सावंतवाडी पोलीसांना दिली. दरम्यान पोलिसांनी घटनस्थळी जाऊन पाहणी केली असता आतील टीव्ही आणि इन्व्हर्टर चोरीला गेल्याची त्यांच्या निदर्शनास आले. तर चोरट्याला समोरील दरवाजा तोडण्यास अपयश आल्यामुळे त्याने मागील ग्रील तोडून घरात प्रवेश करून हा चोरीचा प्रकार केला आहे. याबाबत श्री.गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे या गुन्ह्याचे तपासी अंमलदार श्री. डिसोझा व श्री. तेली यांनी सांगितले.