सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणारा अंजिवडे-पाडगाव रस्ता जुन्या सर्व्हे प्रमाणेच होणार…

9
2
Google search engine
Google search engine

बांधकाम मंत्र्यांचा शब्द; ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गट युती संदर्भात अद्याप निर्णय नाही…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.२२: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या सर्व्हे प्रमाणेच सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा आंजिवडे-पाडगाव हा घाट रस्ता होणार आहे. जुन्या आराखड्यात कोणताही बदल होणार नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही “फॉर्म्युला” ठरलेला नाही. भाजप आणि शिंदे गटाच्या युती संदर्भात देखील कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र गाव स्तरावरील स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीनेच निवडणुका लढल्या जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. श्री. चव्हाण हे गोवा येथे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश यांच्या लग्न सोहळ्यात आले असता त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग कोल्हापूरला जोडणारा
अंजिवडे-पाडगाव हा घाट मार्ग कमी अंतराचा असून हा घाट रस्ता जोडला जावा यासाठी अनेकांनी आंदोलने केली. मात्र त्याला हवी तशी गती मिळाली नव्हती. मात्र सिंधुदुर्गचे पालकमंत्रीच महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या असून पुन्हा एकदा अंजिवडे पाटगाव घाटरस्त्या व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे. दरम्यान हा घाट रस्ता सिंधुदुर्ग व कोल्हापूर बांधकाम विभागाने ज्या पद्धतीने सर्वे केला तसाच व्हावा, अशी मागणी सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव या गावातील ग्रामस्थांची आहे. मात्र हा रस्ता पाटगाव ऐवजी मठगाव मार्गे होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी हा घाट रस्ता पूर्वी बांधकाम विभागाकडून ज्या पध्दतीने सर्व्हे झाला आहे तसाच होईल. याबाबत मी लवकरच कोल्हापूर व सिंधुदुर्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.