नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सिंधुदुर्गात ९६ जणांची “टिम” तयार…

21
2
Google search engine
Google search engine

राजश्री सामंतांची माहिती ; २०० युवक-युवतींना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार…

सिंधुदुर्गनगरी,ता.१८: नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि आपत्तीशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० युवक- युवतींना प्रशिक्षित करण्यात येत आहे. आतापर्यंत ९६ जणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे तर आणखी १०४ तरुण-तरुणींना प्रशिक्षण दिले जात आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये “आपदा मित्र” प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०० युवक- युवतीना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यानुसार १९ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत कुडाळ येथील वासुदेवानंद हॉल येथे १२ दिवसाचे निवासी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील ९६ युवक युवतींना नैसर्गिक आपत्ती काळात कशाप्रकारे मदत कार्य करावे, नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी च्या विविध उपायोजना याबाबत माहिती व प्रात्यक्षिक, तज्ञ प्रशिक्षकांमार्फत देण्यात आले. १२ दिवसाच्या या निवासी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीना आवश्यक सर्व सोयी सुविधां पूरविल्या जात आहेत . तंदुरुस्ती साठी योगा,तसेच मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच त्यांना पूर, रस्ते अपघात, चक्रीवादळ, आग लागणे या सर्व प्रकारच्या आपत्ती वेळी काय करावे, नागरिकांचे जीव कसे वाचवावे, त्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा वापर कसा करावा, रबरी बोट कशी चालवावी, आदी सर्व प्रकारचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर १३जानेवारी ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत आणखी १०४ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी वेळेनुसार दिवसभराचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. रोज तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. मालवण येथील आपत्कालीन ग्रुप, आंबोली आपत्कालीन मदत पथक, सांगेली आपत्कालीन मदत पथक यांची मदत घेण्यात आली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन बाबत तज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दिले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयकृष्ण फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू असून जिल्हाभरातील स्थानिक तरुणांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्ती काळात प्रशिक्षित असलेल्या “आपदा मित्र” यांची मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील तरुण-तरुणी या प्रशिक्षण कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या आपदा मित्र प्रशिक्षण अत्यंत काटेकोरपणे सुरू असून सर्व प्रकारचे प्रशिक्षण मोठ्या उत्साहाने प्रशिक्षणार्थी घेत आहेत .त्यांना आंबोली कावळे साद, महादेवगड पॉईंट, नांगरतास, तसेच विविध समुद्रकिनाऱ्यावर जाऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा अनुभव दिला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपदा मित्र टीम परिपूर्ण प्रशिक्षित अशी असणार आहे. प्रत्येक आपत्कालीन वेळी यांच्या सहकार्याने तात्काळ मदत कार्य करता येणार आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींना स्क्रूबा डायविंग, रबरी बोट चालवणे, ट्रेकिंग, आगीपासून बचाव, आदि विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक आपत्तीशी सामना करण्यासाठी मानसिक दृष्ट्या परिपूर्ण बनवण्यात येणार आहे. त्यांना बौद्धिक मार्गदर्शन देऊन त्यांच्यामध्ये धाडस आणि कोणत्याही प्रसंगी पुढे येऊन तात्काळ मदत कार्य करण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा. यासाठी विविध विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. अशी माहिती राजश्री सामंत यांनी दिली.

* पाच लाखाचे विमा संरक्षण

जिल्ह्यातील प्रशिक्षित आपदा मित्र यांना भविष्यात मदत कार्य करताना दुर्घटना घडून मृत्यू आल्यास त्यांना पाच लाखाचा विमा चा लाभ दिला जाणार आहे. तसेच जाय बंद झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

* विद्युत पुरवठा बाबत प्रशिक्षण

पूर परिस्थिती किंवा चक्रीवादळ अशा आपत्तीवेळी विज पुरवठा सुरु राहिल्याने विद्युत तारांना स्पर्श होऊन अनेकांचे बळी गेल्याचे प्रकार घडतात. अशावेळी तात्काळ वीज पुरवठा खंडित करणे, तसेच काही वेळा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करणे याबाबत आपदा मित्र यांना माहिती असावी. यासाठी त्यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन मार्फत एक महिन्याचा प्रशिक्षण कोर्स दिला जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपदा मित्र सर्वतोपरी प्रशिक्षित असतील. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे.