सावंतवाडीत होणारे सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्र रद्द होण्याच्या मार्गावर….

10
2
Google search engine
Google search engine

रूपेश राऊळ; बांधकाम विभागाच्या अधिकारी सुशेगाद असल्याची टिका…

सावंतवाडी,ता.१७: येथील पोलीस मैदानावर होवू घातलेले सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र रद्द होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत आपल्याकडे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे दीपक केसरकरांनी आणलेले सगळेच प्रकल्प रद्द होतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असलेल्या अधिकारी सुशेगाद आहेत. त्या कार्यालयात भेटत नाहीत. कोणाच्या फोनला उत्तर देत नाही. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यांच्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. श्री. राऊळ यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत केसरकर यांच्या काळात झालेल्या कामांवर टीका केली. यात केसरकर यांनी भूमिपूजन केलेले आणि येथील पोलीस मैदानावर उभारण्यात आलेले सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. ते केंद्र आता रद्द होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्याचा ताबा पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी आपल्याला विश्वसनीय माहिती मिळाली आहे. त्यामुळे केंद्र रद्द न होता ते मार्गी लागण्यासाठी केसरकरांनी प्रयत्न करावे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे ज्याप्रमाणे झाले, तसे या प्रकल्पाचे होऊ नये यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा, असाही टोला श्री. राऊळ यांनी यावेळी लगावला. दरम्यान त्या ठिकाणी बांधकामच्या अधिकारी सौ. अनामिका चव्हाण यांच्यावरही त्यांनी टीका केली. त्या कार्यालयात उपलब्ध होत नाहीत, कोणाचा फोन उचलत नाही, त्यामुळे अनेक विकास कामे रखडले आहेत. त्यांच्या वर कोणाचा अंकुश नसल्यामुळे हा सर्व परिणाम जाणवत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, रश्मी माळवदे, सुुनिता राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, आबा सावंत, शरद जाधव, विश्राम कांबळे, फिलिप्स रोड्रिक्स्, सिताराम देसाई, शिवदत्त घोगळे, प्रसाद नाईक, रमेश सावंत, संदेश केरकर, अशोक परब, गोविंद केरकर, श्रुतिका दळवी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.