सावंतवाडी बसस्थानकाचे काम रेंगाळण्यास जबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत टाका…

8
2
Google search engine
Google search engine

साळगावकरांसह माजी नगरसेवकांची मागणी; एसटीच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर…

सावंतवाडी,ता.२१: तब्बल सात वर्षे पुर्ण झाली तरी येथील बसस्थानकाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे प्रवाशांना व कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार असणार्‍या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आज येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांनी दिला.

सावंतवाडी बसस्थानकाचे काम गेली अनेक वर्षे अर्धवट स्थितीत आहे. याबाबत आज श्री. साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी एसटीचे अधिकारी नरेंद्र बोंधे यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी बोधे यांना धारेवर धरले. तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बांधकाम अधिकारी पाटील यांना रखडलेले बसस्थानकाचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना केल्या. यावेळी आपण वरिष्ठ स्तरावर वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे आम्ही करायचे काय? असा उलट प्रश्न त्यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील तब्बल २३ बसस्थानके अर्धवट स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी दोन्ही अधिकार्‍यांना धारेवर धरले. हे काम पुर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही आवश्यक तो वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करा आणि हे काम रखडण्यास जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली.

यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, शब्बीर मणीयार, सुनिल सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.