मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सावंतवाडीत…

48
2
Google search engine
Google search engine

विविध विकास कामांचे भूमिपूजन; युवराजांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार…

सावंतवाडी,ता.०५: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी युवराज लखमराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत गठीत करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून शिंदेंचा नागरी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादा भिसे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र फाटक, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक व अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमीत्ताने मुख्यमंत्री शिंदे यांचा सावंतवाडी शहराला १०० कोटीपेक्षा अधिक निधी दिल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने सत्कार समिती गठित करण्यात आले असून या सत्कार समितीचे अध्यक्षपदी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यापुर्वी सावंतवाडी शहरात सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कै. रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम याशिवाय क्रीडा संकुलाचेही भूमिपूजन होणार आहे . तसेच दोडामार्ग रूग्णालय, सावंतवाडी शासकीय पर्णकुटी विश्रामगृह नूतनीकरण लोकार्पण करण्यात येणार आहे,. याशिवाय दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन कार्यक्रम ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दीपक केसरकर आणि मित्र मंडळाने केले आहे.