पडत्या फळाची आज्ञा, केसरकर आता भाजपात उडी मारण्याच्या तयारीत…

8
2
Google search engine
Google search engine

प्रविण भोसले; कालचा कार्यक्रम म्हणजे “एकला चलो रे”, फसव्यांपासून जपून रहा, युवराजांना सल्ला…

सावंतवाडी,ता.०७: मंत्री दीपक केसरकर आता भाजपात उडी मारण्याच्या तयारीत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी आता काय अधिक हव असेल तर राणेंकडे मागा, असे त्यांना सांगितल्यामुळे पडत्या फळाची आज्ञा समजून ते आता भाजपात गेले तर नवल नाही, अशी टिका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी केली. दरम्यान कालच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात केसरकर यांची “एकला चलो रे” ची भूमिका दिसली. त्या ठिकाणी युवराज लखमराजेंच्या हस्ते नागरी सत्कार केला. परंतु हे सगळे फसवे आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या पासून जपून रहा, ते कधी घात करतील सांगता येत नाही, असा सल्ला त्यांनी युवराजांना दिला. काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर आज येथे पत्रकार परिषद आयोजित करुन श्री. भोसले यांनी केसरकर व त्यांच्या कार्यपध्दतीवर टिका केली.

यावेळी कोकण विभागीय महिल अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई, चराठा ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गावडे, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारीता फर्नांडिस, सौ. पूजा दळवी आदी उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, केसरकरांचा उद्घाटनाचा खटाटोप पाहता हे सगळे निवडणुकीच्या पूर्वीचे खेळ आहेत. शासन आपल्या दारी ही योजना राबवण्यात येत आहे. मात्र आजपर्यंत कोणाच्या दारात शासन गेले आहे का? हे विचार करण्याची गोष्ट आहे. सावंतवाडी शहराचा इतिहास पाहता या ठिकाणी अनेकांचे नागरिक सत्कार झाले. त्यावेळीची गर्दी आणि माहोल पाहता केसरकारांनी काल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा केलेला नागरी सत्कार ही केवळ औपचारिकताच होती. मुळात केसरकर हे भाजपच्याच वाटेवर आहेत. ते या ठिकाणी टिकणार नाहीत. आतापर्यंत भाजपचेच गुणगान गात आले आहेत. मात्र असे असताना कालच्या बॅनरबाजी मध्ये त्यांनी केवळ मीच काहीतरी करू शकतो हे दाखवून दिले. कारण राज्यात युतीचे सरकार असताना बॅनरवर फक्त केसरकर आणि मुख्यमंत्री हेच झळकत होते. इतर कुठल्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा फोटो त्यावर का दिसला नाही.

सौ. घारे परब म्हणाल्या, सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत जी जी उद्घाटने केली ती कामे कधीच पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे निदान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या कालच्या उद्घाटनाची कामे वेळेत पूर्ण व्हावी ही अपेक्षा. मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न आजही रखडलेलाच आहे. सिंधुदुर्ग ते जनता आरोग्याच्या बाबतीत आजही गोव्यावरच अवलंबून आहे. हे एकूण चित्र असताना काल या ठिकाणी आपला दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मात्र दुसऱ्या दिवशी या दवाखान्याचे दार बंद झाले ही शोकांतिका आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच कालचे भाषण म्हणजे केवळ घोषणांचा पाऊस होता. शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या बाबत ते बोलणार अशी अपेक्षा होती, मात्र त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला.