वेंगुर्लेतील शून्य शिक्षकी शाळांना कायमस्वरूपी शिक्षक द्या…

3
2
Google search engine
Google search engine

ठाकरे शिवसेना आक्रमक; पंचायत समितीच्या पायऱ्यावर बसून धरणे आंदोलन…

वेंगुर्ले,ता.१५: वेंगुर्ले तालुक्यातील १३३ शाळांपैकी १५ शाळा शून्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत. या शाळांवर अन्य शाळेतील एका शिक्षकाला तात्पुरत्या कामगिरीवर पाठवून आज शाळा सुरू करण्यात आल्या परंतु या प्रकारामुळे दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. त्याच्या निषेधार्थ व तत्काळ शिक्षक मिळावेत या मागणीसाठी आज उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे वेंगुर्ले पंचायत समितीच्या पायऱ्यांवर बसून पदाधिकारी व शिवसैनिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या नेतृत्वाखाली तुषार सापळे, प्रकाश गडेकर, अजित राऊळ, संजय गावडे, संदेश निकम, पंकज शिरसाट, सुमन कामत, उमेश नाईक, सुकन्या नरसुले, श्री. शेटकर, आनंद पुराणिक, श्री. सातजी यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक विद्यार्थ्यांसह सहभागी झाले होते. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनीही या आंदोलनाला भेट देऊन जिल्ह्याचा सहभाग दर्शविला.
तालुक्यामध्ये पंधरा शाळा शून्य शिक्षकी बनल्या आहेत. या भागाचे आमदार तथा शिक्षण मंत्री यांच्यासाठी ही लज्जास्पद बाब आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. एक ते सात वर्ग किंवा एक ते चार वर्ग असणाऱ्या शाळांमधील एक एक शिक्षक कमी करून आज या १५ शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु अशाप्रकारे दोन्ही ठिकाणच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी प्रशासनाने डीएड बेरोजगार असणाऱ्या तरुणांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्त पत्र देऊन त्यांना या विषयांवर नियुक्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी गोसावी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु पदाधिकारी यांनी त्यांनाच धारेवर धरले. आणि शिक्षक भरती न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिला आहे.