तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच भूमिगत विजवाहिन्यांसाठी निधी मंजूर केला…

11
2
Google search engine
Google search engine

हरी खोबरेकर ; भाजप पदाधिकाऱ्यांचा खोटारडेपणा, माहिती घेऊन टीका करण्याचा सल्ला…

मालवण, ता. २१ : तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीवर महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने भूमिगत वीज वहिनीसाठी पहिले पाऊल टाकत आराखडा बनवून निधी मंजूर केला होता. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून त्यावेळी राज्य सरकारकडून ४ हजार वीज पोलही मंजूर झाले होते. मात्र वीज समस्यांवरून देवबाग ग्रामस्थांनी आंदोलन केल्यावर ही कामे आताच्या भाजप – शिंदे सरकारने केल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगून खोटारडेपणा करत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तौक्ते वादळात शिवसैनिक लोकांच्या मदतीसाठी कार्यरत होते तेव्हा भाजपचे पदाधिकारी कुठे होते ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शाखा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, संमेश परब, महेंद्र म्हाडगुत, उमेश मांजरेकर, नरेश हुले, उमेश चव्हाण, यशवंत गावकर, सिद्धेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, दत्ता पोईपकर,स्वप्निल आचरेकर आदी उपस्थित होते.

श्री. खोबरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे आपण केली, असे सांगण्याचा खोटारडेपणा भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. आमच्यावर टीका करणाऱ्या भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी त्यांच्याच गावापासून जवळ असलेल्या तोंडवळी गावात जाऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु झालेले व आता पूर्णत्वास गेलेले भूमिगत वीज वाहिनीचे काम पहावे. आज स्वतः व्यापारी असलेले आणि भाजपचे व्यापार उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर हे आमदार नाईकांवर टीका करतात. मात्र शहरात बाजारपेठेत देखील भूमिगत वीजवहिनीसाठी श्री. नाईक यांच्या प्रयत्नातून आघाडी सरकारने ५ कोटीचा निधी मंजूर केला असताना या कामासाठी व्यापारी म्हणून केनवडेकर किंवा अन्य व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. तसेच यामध्ये ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी लागणारी जागाही उपलब्ध न झाल्याने हा निधी मागे गेला, याची माहिती केनवडेकर यांनी टीका करण्यापूर्वी घ्यावी.

वीज समस्यांबाबत देवबाग ग्रामस्थांनी घेतलेली आंदोलनाची भूमिका योग्य असून त्याला आमचा पाठिंबा आहे. देवबाग गावच्या वाढत्या वीज मागणीसाठी देखील आमदार नाईक यांनी पुढाकार घेतला. देवबाग साठी मंजूर केलेले तीन ट्रान्सफॉर्मर जागे अभावी उभारता आले नाही. देवबाग ग्रामस्थांनी आंदोलन केल्यावर आता भाजपला देवबागचा पुळका येत आहे. मात्र, गेल्या वर्षभरात तुमची सत्ता असताना, तुमचे पालकमंत्री असताना देवबागसाठी आवश्यक वीज ट्रान्सफॉर्मर देण्याचे काम का झाले नाही ? असा प्रश्न खोबरेकर यांनी उपस्थित केला.

देवबाग किनारपट्टीवरील संरक्षक बंधाऱ्याच्या कामाचा गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शुभारंभाचा फोडलेला नारळ कुसका निघाला. आतापर्यंत त्याठिकाणी एक दगडही पडलेला नाही. त्यामुळे भाजप पदाधिकारी नारायण राणे यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करणार का ? काम न झाल्याबद्दल आंदोलन करणार का ? असा प्रश्न खोबरेकर यांनी उपस्थित केला. भाजप- शिंदे सरकारचे शिक्षणमंत्री असताना आणि तेही याच जिल्ह्यातील असताना जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांना शिक्षक नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

देवबाग गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेले ८ कोटी निधीचे नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. तारकर्ली रांजनाला पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. आमदार नाईक तसेच आपण जिल्हा परिषद सदस्य असताना देवबाग, तारकर्ली, वायरी या भागासाठी विविध कामे केली, त्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, ज्यांनी कधी कुठे पाऊल ठेवले नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये. भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रथम आपल्या पक्षातील भांडणे सोडवावीत नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकावून पहावे, असेही खोबरेकर म्हणाले.