महामार्गावर सर्विस रस्त्याचा भराव वाहून जात रस्ता खचला…

12
2
Google search engine
Google search engine

साकेडी फाटा येथील घटना ; अपघात होण्याची शक्यता…

कणकवली,ता.३०: मुंबई-गोवा महामार्गावर साकेडी फाटा या ठिकाणी यावर्षी नव्याने करण्यात आलेल्या सर्विस रोडचा भराव पावसात वाहून गेला आहे. हा सर्विस रोड वाहतुकी धोकादायक बनला आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरण चे उपअभियंता अतुल शिवनिवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधून देखील पावसा पूर्वी या ठिकाणी कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने अखेर आता हा रस्ता कोणत्याही क्षणी मोठया पावसात भराव वाहून जात बंद होण्याची शक्यता आहे.

महामार्ग प्राधिकरण या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष न देता डोळेझाक करत असल्याने या ठिकाणी अपघात होत जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साकेडी फाटा या ठिकाणी एस एस बोअरवेल च्या समोरील भागात मातीचा भराव करून हा सर्विस रस्ता करण्यात आला होता. ह्या भरावाच्या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा दगडी पिचिंग करण्याची गरज होती. मात्र अशी कोणतीच कार्यवाही न केल्याने गेले आठ दिवस झालेल्या किरकोळ पावसानेच रस्त्याचा काही भाग खचून माती वाहून गेली आहे. त्यामुळे मोठ्या पावसाच्या वेळी या ठिकाणचा रस्त्याचा बहुतांशी भाग वाहून गेल्यास रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपभियंता अतुल शिवनिवार यांनी याबाबत केसीसी बिल्डकाँन च्या अधिकाऱ्यांना अनेकदा सूचना दिल्या. मात्र तरी या बाबत कोणतीच कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे आता येथे अपघात घडून जीवितहानी होऊ नये म्हणून महामार्ग प्राधिकरण प्रांताधिकारी व तहसीलदार लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.