…अन्यथा कणकवलीत रुग्णालय बंदचा फलक लावू…

19
2
Google search engine
Google search engine

नितेश राणे संतापले; उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा घेतला आढावा…

कणकवली,ता.३०: तुम्‍हाला रुग्‍णांवर उपचार करायचे नसल्‍यास तसे सांगा. हे रूग्‍णालय फक्‍त डॉक्‍टरांसाठी असून इथे रूग्‍णसेवा मिळणार नाही, असा फलक आम्‍ही उपजिल्‍हा रूग्‍णालयाबाहेर लावतो असा संताप आमदार नितेश राणे यांनी आज व्यक्‍त केला. तसेच रूग्‍णसेवेत हेळसांड झाली तर डॉक्‍टरांना टोकाचे रूग्‍णालय दाखवू असा इशाराही त्‍यांनी दिला.
कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात वैद्यकीय अधिकारी असूनही योग्‍य उपचार होत नाहीत. प्रसृती तसेच इतर आजाराचे रूग्‍ण जिल्‍हा रूग्‍णालय किंवा खासगी रूग्‍णालयात पाठविले जातात अशा तक्रारी श्री.राणे यांच्याकडे तालुक्‍यातील रूग्‍णांनी केल्या होत्या. त्‍यानंतर आज श्री.राणे यांनी उपजिल्‍हा रूग्‍णालयात जाऊन आढावा घेतला. यावेळी उपजिल्‍हा रूग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी यांच्यासह इतर डॉक्‍टर आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयातील आयसीयु यंत्रणा बंद आहे. प्रसुतीचे रूग्‍ण अन्यत्र पाठवले जातात. डॉ.धनंजय रासम वगळता अन्य तज्‍ज्ञ डॉक्‍टर रूग्‍णालयात नसतात या मुद्दयांवर श्री.राणे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्माधिकारी यांना धारेवर धरले. इथल्‍या डॉक्‍टरांना रूग्‍णांवर उपचार करणे शक्‍य नसेल तर तसे स्पष्‍ट सांगा आम्‍ही त्‍या डाॅक्‍टरांना अन्य रूग्‍णालयांत पाठवू पण रूग्‍णसेवा मिळायलाच हवी.
राणे म्‍हणाले, आयसीयू यंत्रणा सुरू करण्यासाठी काही यंत्रसामग्री हवी असेल किंवा उपजिल्‍हा रूग्‍णालयासाठी अन्य औषधे, साहित्‍य हवे असेल तर आम्‍हाला सांगा आम्‍ही आरोग्‍य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्‍या इथे आणू. पण डॉक्‍टरांनी रूग्‍णसेवेला प्राधान्य द्यायलाच हवे. यापुढे
अत्‍यवस्थ वगळता उर्वरीत सर्व रूग्‍णांवर इथेच उपचार व्हायला हवेत. ओरोस किंवा सावंतवाडीला इथे रूग्‍ण जाता नये याची काळजी घ्या. तसेच इथल्‍या डॉक्‍टरांनी आधी आपली मानसिकता बदलावी.
यावेळी श्री.राणे यांच्यासमवेत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गटनेते संजय कामतेकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यावेळी उपस्थित होते.