वैभव नाईकांनी खोटे बोलण्याचे धंदे बंद करावेत…

18
2
Google search engine
Google search engine

बबन शिंदे ; मालवणातील मेळाव्यात राजकीय फटाके फुटणार, राजा गावकर…

मालवण, ता. १७ : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारकडून मंजूर झालेल्या तालुक्यातील विकासकामांची भूमिपूजन करण्याचे काम स्थानिक आमदार वैभव नाईक हे करत आहेत. खोटे बोलण्यात माहीर असलेल्या आमदारांनी आपण निधी आणला असे सांगून जनतेला फसविण्याचे धंदे बंद करावेत अशी टीका शिवसेनेचे कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

हॉटेल रामेश्वर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, पराग खोत, नीलम शिंदे, भारती घारकर, गीता नाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, पूर्वीच्या सरकारमधील चांदा ते बांदा आणि आताच्या सरकारमधील सिंधू-रत्न योजना ही विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांसह अन्य घटकांना लाभ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे या योजनेचे संपूर्ण श्रेय हे केसरकर यांनाच जाते. याउलट चांदा ते बांदा योजना बंद करण्याचे पाप मागील सरकारच्या काळात झाले. त्यामुळे आमच्या नेत्यांनी ही योजना सुरू केले हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगणे चुकीचे आहे. खोटे बोलण्यात माहीर असलेल्या आमदार नाईकांचे मतदार संघात गेल्या काही वर्षातील कार्य जनतेला माहीत आहे. त्यांच्याकडून केवळ जनतेची फसवणूक करण्याचे एककलमी काम सुरू आहे. त्यामुळेच ते तालुक्यातील विविध विकासकामांसाठी जो निधी मंजूर झाला आहे. तो आपणच आणला असे सांगून त्याची भूमिपूजन करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. मात्र या कामांना निधी कोणी दिला हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि फुकाचे श्रेय घेऊ नये.

श्री. गावकर म्हणाले, सप्टेंबर महिन्यात मालवणात शिवसेनेचा भव्य मेळावा घेण्याचे नियोजन आले आहे. या मेळाव्यात स्थानिक राजकारणात मोठे फटाके फुटतील. त्यावेळी आमदारांना आपल्यासोबत कोण राहिले हे समजेल. या मेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य नेत्यांना बोलाविण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात तसेच तालुक्यात विभागनिहाय विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.