केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या वेंगुर्ल्यात…

14
2
Google search engine
Google search engine

प्रसन्ना देसाई; परबवाडा येथील कार्यकर्त्यांना बुथवर जाऊन भेट देणार…

वेंगुर्ले,ता.१८: देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या वेंगुर्ला दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते परबवाडा येथे जाऊन बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा भाजपचे सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली. लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात सर्वांनी सहभाग व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सरचिटणीस साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, अल्पसंख्यांक सेलचे सायमन आल्मेडा, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, परबवाडा उपसरपंच पपू परब आदी उपस्थित होते.

देशात १४४ लोकसभा मतदार संघात भाजपाचे खासदार नाहीत. महाराष्ट्रात १८ मतदार संघात भाजपाचे खासदार नाहीत. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार नाहीत अशा चार चार मतदार संघाचे क्लस्टर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या संयोजकपदी माजी मंत्री बाळासाहेब झगडे यांची नियुक्ती केली आहे. सहसंयोजक प्रमोद जठार असून रत्नागिरी व सिधुदुर्गचे संयोजक अतुल काळसेकर आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली लोकसभा प्रवास योजनेचे काम सुरू आहे. अजयकुमार मिश्रा यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यापूर्वी दौरा केला होता. मात्र, ते वेंगुर्ल्यात आले नव्हते. त्यामुळेच ते १९ जुलैला वेंगुर्ल्यात प्रथमच येत आहेत.

१९ रोजी सायंकाळी ४ वाजता ते वेंगुर्ला नगरपरिषदच्या स्वच्छ पर्यटन स्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर नगरपरिषदच्या कलादालनास भेट, ५ वा. परबवाडा बुथ नं.५७ वर बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शहरातील विविध विकास कामांना भेटी देणार असल्याची माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली.