सरंबळ येथील त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना राबवा…

49
2
Google search engine
Google search engine

भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी; डोंगर खचण्याची भीती असल्याचे म्हणणे…

कुडाळ,ता.२५: तालुक्यातील सरंबळ येथील धोकादायक डोंगराची आज भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणी असलेला डोंगर खचण्याची भीती असून गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाय योजना राबविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी केली आहे.

यावेळी सरपंच रावजी कदम, ग्रामपंचायत उपसरपंच सागर परब, महेश सरमळकर, बंटी गोसावी, सुनील हादगे, अमोल कदम, श्रावण जाधव, अरूण कदम, संदिप जाधव, गौरेश गोसावी पोलीस पाटील वराडकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

तालुक्यातील सरंबळ येथील देऊळवाडीमधील डोंगराचे मागील अनेक वर्ष भूस्खलन होत आहे. यावर्षी देखील पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या डोंगरातील माती रस्त्यावर आली असून डोंगराला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. या डोंगराला लागूनच मुख्य रस्ता व त्याच्याखाली सुमारे २५ ते ३० घरे आहेत. भविष्यात हा डोंगर खचल्यामुळे किंवा झाडे पडल्यामुळे गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. सरंबळ गावातील बहुतांशी वाड्या या डोंगराच्या अलीकडे असून याच डोंगराच्या पलीकडे गावचे मुख्य देऊळ, ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सोसायटी व प्रमुख आस्थापना आहेत. डोंगर खचल्यामुळे या सर्वांचा संपर्क तुटण्याचा संभव आहे. हा धोका लक्षात घेऊन सरपंच रावजी कदम यांच्या विनंतीनुसार देसाई व पंचायत समिती माजी सदस्य संदेश नाईक यांनी सरंबळमधील या धोक्याच्या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली. याबाबत उद्या पालकमंत्री व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.