बांदा केंद्रशाळेत वाचन दिन साजरा…

29
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२६: येथील नट वाचनालय संस्थेच्या वतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनदिन हा कार्यक्रम येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. महाबळेश्वर सामंत (पेडणे-गोवा) हे होते.

यावेळी व्यासपिठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री सामंत यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

दिनांक १९ जून ते १८ जुलै २०२३ हा कालावधी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व वाचनाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी “वाचनदिन” हा कार्यक्रम वाचनालयाच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय मुलांच्या कथाकथनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी इयत्ता ५ वी ते ७ वी च्या सर्वेक्षा ढेकळे, सर्वज्ञ वराडकर, रेहान खानोलकर, नील बांदेकर आर्या चव्हाण, आर्या शिंगडे या शालेय मुलांनी आपल्या कथा सादर केल्या.

श्री सामंत यांनी यावेळी मुलांना वाचनाचे महत्व पटवून दिले. शास्त्रज्ञ, साहित्यिक, जगातील नामवंत व्यक्ति यांना वाचनामुळे प्रसिध्दी मिळाली असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मुलांना अनेक गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी केले. यावेळी सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोस्कर, निलेश मोरजकर, सौ. स्वप्निता सावंत, अंकुश माजगांवकर, श्रीम. पुजा कामत शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमात साठ शालेय मुलांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले.