वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकावर आमची करडी नजर…

10
2
Google search engine
Google search engine

पोलीस अधीक्षकांचा इशारा; नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई…

ओरोस,ता.२६: वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यातील धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांवर जिल्हा पोलिसांची करडी नजर आहे. मद्य, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तसेच महिलांची छेडछाड काढणाऱ्या, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहेत. यासाठी आंबोली, मांगेली, सावडाव, कुंभवडे, शिवडाव या धबधब्याच्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली, मांगेली, सावडाव, कुंभवडे, शिवडाव या ठिकाणी पर्यटकांना भुरळ घालणारे धबधबे मोठ्या प्रमाणावर वाहण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने गोवा कर्नाटक व इतर राज्यातून व जिल्ह्यातून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात धबधब्यांच्या ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसोबत भेट देत आहेत. जिल्ह्यातील आंबोली, मांगेली, सावडाव, कुंभवडे, शिवडाव या धबधब्याच्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनाचा आनंद उपभोगत असताना मद्य सेवन करणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे, मोठमोठ्याने इतर पर्यटकांना त्रास होईल अशा प्रकारचे वर्तन ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, वाहने रस्त्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा रीतीने रस्त्यात उभी करणे, महिलांची छेडछाड करणे, पोलिसांनी दिलेले निर्देश न पाळणे अशा पर्यटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एसपी अग्रवाल यांनी दिला आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी आपल्यामुळे इतर पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपल्या वर्तनामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यटकांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.