आंबोली घाटातील स्टॉलवर वनविभागाच्या कारवाईचा बडगा…

11
2
Google search engine
Google search engine

सात स्टाॅल हटविले; सर्वच स्टॉल काढून टाकणार, वनाधिकारी विद्या घोडकेंचा इशारा…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.२६: आंबोली घाटात मुख्य धबधब्यासह अन्य ठिकाणी असलेल्या स्टॉलवर आजपासून कारवाईचा बडगा उभारण्यात आला. सकाळपासून ही मोहीम राबवण्यात आली असून तब्बल सात स्टॉल काढण्यात आले आहेत. याबाबत आंबोलीच्या वन अधिकारी विद्या घोडके यांनी दुजोरा दिला असून मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रात कचरा होत असल्यामुळे सर्वच स्टॉल काढून टाकण्यात येणार आहेत तसे वरिष्ठांनी आदेश दिले आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान काही स्टॉलवर कारवाई करण्यात आली, असा आरोप तेथील व्यावसायिक बापू पाटील यांनी केला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा वनविभाग आणि स्थानिक व्यावसायिक असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
आंबोली घाटात धबधबा तसेच अन्य छोट्या धबधब्यांच्या ठिकाणी चौकुळ, आंबोली, गेळे आदी भागात स्थानिक रहिवाशांचे २० ते २५ स्टाॅल आहेत. तीन वर्षापूर्वी रातोरात हे स्टाॅल काढून टाकण्यात आले होते. यावेळी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कारवाईला स्थगिती दिली. त्यासाठी तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व महेश सारंग यांनी जोरदार प्रयत्न केला होता. दरम्यान पुन्हा या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी त्या ठिकाणी असलेले स्टॉल काढण्यात आले. याबाबतची माहिती व्यावसायिक बापू पाटील यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार आंबोली वनविभागने केलेली कारवाई ही एकतर्फी आहे. आपण अपघात होऊन जायबंदी आहोत. सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेत आहोत, असे असताना त्या ठिकाणी आपला स्टॉल काढून टाकण्यात आला. त्यामुळे आपल्यावरच कारवाई का? असं सवाल तरी उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत वन अधिकारी घोडके यांचे संपर्क साधला असता त्यांनी कारवाईबाबत दुजोरा दिला आहे. त्या ठिकाणी आपल्याला वरिष्ठांचे आदेश आहेत. घाटात मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत. त्यांच्यापासून व तेथे थांबणाऱ्या पर्यटकांपासून वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा होतो. त्यामुळे वारंवार सूचना देऊन सुद्धा व्यावसायिक कडून सहकार्य नाही. परिणामी आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आणि त्यात सातत्य राहणार आहे. घाटातील सर्व स्टॉल काढून टाकण्यात येणार आहेत. वनविभाज्या भूमिकेमुळे आता पुन्हा वनविभाग विरुद्ध स्थानिक व्यापारी असा वाद रंगण्याची शक्यता आहे.