कोकण आयुक्‍तांचा दौरा महसूलचे प्रश्‍न सोडविण्यासाठी की हॉटेल्स फिरण्यासाठी…?

16
2
Google search engine
Google search engine

शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख राजू शेट्ये यांचा सवाल; मुख्य सचिवांकडे तक्रार करणार…

कणकवली, ता.०५ : कोकण विभागाचे आयुक्‍त महेंद्र कल्‍याणकर हे सिंधुदुर्ग दौऱ्यात जिल्ह्यातील चार हॉटेल्‍स मध्ये थांबणार आहेत. त्‍यामुळे त्‍यांचा हा दौरा महसूलचे प्रश्‍न सोडविण्यासाठी की हॉटेलिंगसाठी? असा प्रश्‍न शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख राजू शेट्ये यांनी आज उपस्थित केला. तसेच त्‍यांच्या या दौऱ्याबाबत राज्‍याच्या मुख्य सचिवांकडे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तक्रार करणार असल्‍याचेही ते म्‍हणाले.
श्री.शेट्ये म्‍हणाले, एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल विभाग अनेक ठिकाणी अवैधरित्या काम करत आहे. महसूल विभागातील अनेक कामे रखडली आहेत. महसूल विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असून अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच कोकण विभागीय आयुक्तांकडे अनेक अपील दाखल आहेत. परंतु त्यावर निर्णय झालेले नाहीत. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणारे कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर हे जिल्ह्यातील चार-चार हॉटेल्समध्ये फिरणार आहेत. महसूल विभागाने त्यांची चांगली खातरदारी केली आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांचा सिंधुदुर्ग दौरा महसूल विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे कि, जिल्ह्यातील हॉटेल्स फिरण्यासाठी आहे.
ते म्‍हणाले, कोकण आयुक्तांच्या या दौऱ्यातून सिंधुदुर्गला काय मिळणार? त्यामुळे कोकण आयुक्तांच्या दौऱ्याची चौकशी होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याची आणि अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठविण्याची मागणी करणार असल्याचे राजू शेटये यांनी सांगितले आहे.