आंबोलीत गवारेड्याचे मांस जप्त…?

11
2
Google search engine
Google search engine

पोलिस व वनविभागाची कारवाई; आजऱ्यातील एक ताब्यात, एक फरार…

आंबोली,ता.०६: मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी आजर्‍यातील एकाला ताब्यात घेतले आहे तर एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला. ते मांस गवा रेड्याचे असावे, असा वनअधिकार्‍यांचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना काल रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. इर्शाद नुरमुहम्मद ब्यापारी (वय४४, रा.आजरा, मारुती गल्ली) असे त्याचे नाव आहे. दरम्यान पुढील कारवाईसाठी हा गुन्हा वनविभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. तर हे मांस तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असे मत आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोलीत रात्रीच्या वेळी ड्युटी करीत असलेल्या आंबोली पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई व त्यांचे सहकारी दिपक शिंदे, मनिष शिंदे, राजेश गवस, अभिषेक सावंत आदींनी मारुती ओमनी कार कोल्हापुरहून सावंतवाडीच्या दिशेने येताना दिसली. यावेळी त्या गाडीला थांबण्यासाठी त्यांनी इशारा केला असता त्या चालकाने तेथून सावंतवाडीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडी पुढे जावून वनविभागाच्या नाक्याकडे अडविण्यात आली. यावेळी गाडीची तपासणी केली असता त्यात मांस दिसून आले. त्यामुळे याबाबतची माहिती आंबोली वनविभागाच्या अधिकार्‍यांना देवून पुढील कारवाईसाठी तो गुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे हवालदार श्री. देसाई यांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणी घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, संबंधित मांस हे नेमके कोणाचे आहे ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. परंतू तुर्तास तरी ते मांस गवा रेड्याचे असल्याचा आम्हाला अंदाज आहे. त्यानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या इर्शाद यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे तर पळून गेलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.