देवगडात एकाच दिवशी आढळले दोन महिलांचे मृतदेह…

21
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.०६: तालुक्यात आज दोन महिलांचे मृतदेह सापडले यातील एक महिला ओहोळात तर दुसऱ्या महिलेचा मृतदेह खाडीत आढळला आहे. यातील एक महिला ही बेपत्ता होती. तर दुसर्‍या महिलेची मनस्थिती बिघडली होती. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिभा प्रकाश दुसणकर (५५) या महिलेचा सडलेल्या स्थितीत मृतदेह आज सकाळी बापर्डे डोेकांबा ओहळाच्या पाण्यात सापडला. बापर्डे हेदाडवाडी येथील प्रतिभा प्रकाश दुसणकर या महिलेची मनस्थिती बिघडलेली होती. याच स्थितीत २२ जुलैला सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यांचा मुलगा बाळकृष्ण दुसणकर यांनी शोधाशोध केली. मात्र आपल्या आईचा शोध न लागल्याने त्यांनी देवगड पोलिस स्थानकात बेपत्ताची तक्रार दिली होती. आज सकाळी बाळकृष्ण हा आईचा शोध घेत असताना बापर्डे डोेकांबा ओहळाकडे त्यांना कुजकट वास येवू लागल्याने त्यांनी पाण्याचा दिशेने जावून बघितले. यावेळी पाण्यात सडलेल्या स्थितीत एका महिलेचा मृतदेह दिसला.
दरम्यान टेंबवली गावठणवाडी येथील प्रतिभा प्रदीप बापर्डेकर(५०) ही महिला शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडून कामानिमित्त गेली होती. घरात तिचे पती होते. तर मुलगाही कामाला गेला होता. सायंकाळी घरी कामावरून आल्यानंतर आई दिसली नाही. ती कुठेतरी कामाला गेली असेल म्हणून वाट पाहिली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी आली नाही म्हणून शोधाशोध केली. ती सापडली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीही शोधाशोध केली. दरम्यान आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मळई येथील माजी नगरसेवक उमेश कणेरकर यांनी देवगड पोलिस स्टेशनला मळई खाडी किनारी एका महिलेचा मृतदेह पाण्याबरोबर तरंगत आला असल्याचे सांगितले. तात्काळ पोलिस उपनिरिक्षिक जितेंद्र कांबळी, पोलिस हवालदार उदय शिरगांवकर, महिला पोलिस नाईक कविता लाड, निलेश पाटील, विशाल वैजल यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व आईचा शोध घेण्यासाठी आलेल्या तुषार बापर्डेकर याला मृतदेह दाखविण्यात आला. यावेळी त्यांनी आईचाच मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी खबर घेवून आकस्मिक मृत्युची नोंद केली.