एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी…

29
2
Google search engine
Google search engine

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम ; विक्रमी १७,५०७ राख्या रवाना होणार…

मालवण, ता. ०८ : देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन निमित्त सैनिकांना राख्या पाठविणे हा स्तुत्य उपक्रम आहे. आज पुरुषांबरोबर महिलाही लष्करी सेवेत असून देशाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींबरोबरच विद्यार्थ्यांनीही सीमेवरील आपल्या सैनिक बहिणींसाठी राखी पाठवावी. सैनिक देशासाठी लढत असले तरीही देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे सक्षम होऊन आपल्या कार्यातून देशासेवा करत राहावी असे प्रतिपादन तहसीलदार वर्षा झालटे यांनी येथे केले.
भावा बहिणीच्या नात्याचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयातर्फे एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी हा उपक्रम प्रा. पवन बांदेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. यावर्षी या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे. यावर्षी या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतःच्या हाताने विक्रमी अशा १७,५०७ एवढ्या विक्रमी राख्या बनवल्या असून त्या पोस्टाद्वारे देशाच्या सीमेवर विविध भागात तैनात असलेल्या सैनिकांना पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहेत. यासाठी माजी विद्यार्थी व टेक्नो कंपनीचे डायरेक्टर मंगेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले आहे.
या राख्या पाठविण्याचा कार्यक्रम आज मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. व्यासपीठावर एलआयसीच्या मालवण ब्रँच मॅनेजर सतेजा बोवलेकर, माजी सैनिक दीपक बागवे, प्राचार्य हणमंत तिवले, प्रा. पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत करून त्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. पाहुण्यांचा परिचय प्रफुल्ल देसाई यांनी केली. प्रा. बांदेकर यांनी प्रास्ताविक करत गेली सात वर्ष सुरु असलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. तर यावेळी सर्वात जास्त राख्या बनविणारी अकरावी कला शाखेची विद्यार्थिनी प्रेरणा परब हिच्यासह इतर विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी विचार मांडत या उपक्रमाचे कौतुक करीत पुढील वेळी विद्यार्थ्यांनी देखील महिला सैनिकांसाठी राख्या पाठवाव्यात असे आवाहन केले. तसेच मालवण मध्ये किल्ले सिंधुदुर्गवर ४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नौदल दिना विषयी माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, माजी सैनिक दीपक बागवे, एलआयसी अधिकारी सतेजा बोवलेकर यांनीही मनोगत व्यक्त करत सैनिकांना राख्या पाठविण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सूत्रसंचालन प्रा. सुनंदा वराडकर यांनी केले. आभार प्रा. स्नेहल पराडकर यांनी मानले. यावेळी प्रा. जितेंद्र गावडे, प्रा. गणेश सावंत, अदिती शेरलेकर, सौ. गावडे, पूजा कदम, रत्नाकर कोळंबकर, राजन कामत, भार्गव खराडे आदी उपस्थित होते.