सत्कारासाठी गेलेल्या महिलेचा ग्रामपंचायत कार्यालयात अपमान…

23
2
Google search engine
Google search engine

वेर्ले गावातील प्रकार; जातीवाचक शिवीगाळ करुन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल…

सावंतवाडी,ता.१८: स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या कार्यक्रमात सत्कारासाठी आलेल्या महिलेचा अपमान केल्याच्या कारणावरुन वेर्ले येथील एका जेष्ठ नागरीकावर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयात घडली. शिवराम कृष्णा राऊळ (वय ६०) असे संशयिताचे नाव आहे. आपल्याला व आपल्या पतीस भर कार्यक्रमात जातीवाचक शिवीगाळ, मनाला लज्जा निर्माण होईल असे बोलले, अशी तक्रार त्यांनी दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “मेरी माटी मेरा देश” या अभियाना अंतर्गत वेर्ले ग्रामपंचायत मध्ये माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फिर्यादी यांचे पती बाहेर असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची पत्नी सत्कारासाठी गेली होती. यावेळी माजी सैनिकाच्या सत्काराला महिला आली याचा राग आल्यामुळे राऊळ याने त्या महिलेला व तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ केली तसेच मनाला लज्जा निर्माण होईल असे बोलल्याची तक्रार सावंतवाडी पोलिसात दिली आहे. त्यानुसार राउळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे श्री. अधिकारी यांनी सांगितले.