कुडाळ तालुक्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ…

11
2
Google search engine
Google search engine

नागरिकांनी सतर्कता बाळगावी; आरोग्य विभागाचे आवाहन…

कुडाळ,ता.०९: तालुक्यामध्ये सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असून शहरासह १० ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येत्या गणेश चतुर्थी उत्सवामध्ये नागरिकांनी खबरदारी घेऊन ताप आल्यावर तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी,असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे यांनी तहसील कार्यालय येथे घेतलेल्या साथ रोग प्रतिबंध उपाययोजना अंतर्गत बैठकीमध्ये सांगितले. दरम्यान तहसीलदार अमोल पाठक यांनी ज्याप्रमाणे कोविडमध्ये आपण काम केले त्याप्रमाणे या साथ रोगांमध्ये काम करणे अपेक्षित आहे असे मत व्यक्त केले.
साथ रोग प्रतिबंध उपाय योजनेअंतर्गत तहसील कार्यालय येथे तहसीलदार अमोल पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी बांधकाम व्यवसाय, गॅरेज व्यवसायिक उपस्थित होते. या बैठकीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी संदेश कांबळे यांनी कुडाळ तालुक्यामध्ये जानेवारी महिन्यापासून १०२ रुग्ण हे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया याचे सापडले आहेत. पण यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे डेंग्यूच्या रुग्णांचे आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ७७ रुग्णांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ताप आल्यावर घरी किंवा मेडिकल मधून औषध न घेता त्या तापाची तपासणी करावी. कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ शहर, बांव, डिगस, कसाल, पणदूर, पिंगुळी, माणगाव, वर्दे, वेताळ बांबर्डे या ठिकाणी रुग्णसंख्या असून आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा, साचलेल्या डबक्यांमध्ये ऑइल टाका म्हणजे अळी मरून जातील आरोग्य विभागामार्फत ही प्रयत्न केले जात आहेत. येत्या गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार अमोल पाठक यांनी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तिथे आरोग्य पथके नेमली जाणार आहेत. या रुग्णांची वाढ होऊ नये म्हणून आरोग्य विभागामार्फत विविध तपासण्या केल्या जाणार आहेत. ज्याप्रमाणे कोरोनामध्ये सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले तसेच यामध्ये सुद्धा करावे आरोग्य विभाग सातत्याने सहकार्य करणार आहे असे स्पष्ट केले.