सावंतवाडीत फुगडी भजन स्पर्धा आणि खेळ पैठणीचे आयोजन…

12
2
Google search engine
Google search engine

२४ ते २८ सप्टेंबरला रंगणार कार्यक्रम;पालिकेसह शिक्षणमंत्र्यांचा पुढाकार…

सावंतवाडी,ता.२२: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात २४ ते २८ सप्टेंबर या काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात फुगडी स्पर्धा, भजन स्पर्धा खेळ पैठणीचा यासह ऑर्केस्टाचा समावेश आहे. हे कार्यक्रम सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत घेण्याचा निर्णय आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि व्यापार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विजयी स्पर्धकांना वेगवेगळी बक्षीसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. सावंतवाडी नगरपरिषद इंदिरा गांधी व्यापारी संकुल, संत गाडगेबाबा भाजी मंडई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली.

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, निता कविटकर, गजा नाटेकर , पुंडलिक दळवी, प्रसन्न शिरोडकर, शोएब बेग, राजन श्रृंगारे, राजू रेमणे, प्रसाद मुंज, बंड्या धारगळकर, संदिप परुळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.केसरकर यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले, या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन आले. यात सकाळी १० वाजता आरती, दुपारी ३ ते ५ महिलांचे कार्यक्रम, सायंकाळी ५ ते ८ भजन स्पर्धा, रात्री ८ वाजता आरती त्यानंतर ऑर्केस्टाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धात सर्व स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.