तेरेखोल नदीपात्रात वाळू उपसा करणार्‍या तस्करांकडून ग्रामस्थांवर दगडफेक…

4
2
Google search engine
Google search engine

सातोसेतील घटना; संबंधितांना रोखा, अन्यथा माड बागायती नदीत वाहून जाणार, ग्रामस्थांची भिती…

सावंतवाडी,ता.२३: तेरेखाल नदीपात्रात वाळू उत्खनन करणार्‍या गोव्यातील तस्कराकडुन ग्रामस्थांवर दगडफेक करण्यात आली आहे. वाळू उपसा करण्यास विरोध केल्याच्या रागातून काल रात्री दिड वाजण्याच्या सुमारास सातोसे येथे हा प्रकार घडला. दरम्यान याबाबत तेथील ग्रामपंचायत सदस्य कृष्णा कळगुंटकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण याबाबत पोलिस पाटील संदिप सातार्डेकर यांना याआधीच कल्पना दिली होती. त्यामुळे आमची माडबागायती नदीत वाहुन जात आहे. त्यामुळे आता महसुल प्रशासनाने वाळू तस्करांना रोखावे, अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला आहे.
गोवा येथील वाळू तस्कराकडून सातोसे-सातार्डा भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या सिमेकडून वाळू काढली जात असल्यामुळे स्थानिक लोकांच्या जमिनी आणि माड बागायती नदीत वाहून जात आहे. त्यामुळे गेली काही वर्षे स्थानिक लोक आणि वाळू तस्कर यांच्यात शितयुध्द सुरू आहे. दरम्यान काल रात्री सुमारे वीस ते पंचविस होड्या सातोसे येथील नदीपात्रात महाराष्ट्राच्या सिमेकडुन वाळू उपसा करीत होत्या. याबाबतची कुणकुण लागल्यानंतर तेथील स्थानिक माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा कळगुंटकर व त्यांचे सहकारी अर्जुन रेडकर, सुरेश मयेकर, निलेश कळगुंटकर आदींनी त्यांना नदीच्या तिरावर राहून अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यातील काही लोकांनी शिवागीळ करुन ग्रामस्थांवर थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली. अचानक दगडफेक झाल्यामुळे ग्रामस्थ भेदरले आहेत.
याबाबतची माहिती सदस्य कळगुंटकर यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुद्द्यावरून आम्ही अनेक वेळा शासन दरबारी आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दिला. परंतू गोव्यातील वाळू तस्करांकडुन बेकायदा वाळू उपसा करण्याचे काम सुरू आहे. त्यांना विचारणा करण्यास गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवीगाळ तसेच दगडफेक केली जाते. काल सुध्दा तसाच प्रकार घडला आहे. त्यामुळे महसुल प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.