राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे २७ तारखेला दोडामार्गात…

2
2
Google search engine
Google search engine

अमित सामंत; सावंतवाडी विधानसभा लढण्यासाठी कंबर कसल्याचा दावा…

दोडामार्ग,ता.२१: सावंतवाडी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील यांच्या दौर्‍यानंतर खासदार सुप्रिया सुळे २७ तारखेला दोडामार्गात येत आहे. यावेळी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्या आला आहे. त्याच बरोबर हत्ती आणि कळणे एमआयडीसी या ज्वलंत प्रश्नांबाबत विचारमंथन होणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. दरम्यान हा दौरा झाल्यानंतर सौ. सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. यावेळी आगामी काळात होणार्‍या निवडणूकाबाबत पॉलिसी ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला मित्रपक्षाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी महिला नेत्या अर्चना घारे, जेष्ठ नेते सुरेश दळवी, पुंडलिक दळवी, प्रदिप चांदेलकर, संदिप गवस, विवेक गवस, विलास सावळ आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, सौ. सुळे या पहिल्यांदाच दोडामार्ग मध्ये येत आहे. त्यांच्या उपस्थितीत येथील महालक्ष्मी सभागृहात राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. यावेळी दोडामार्ग तालुक्यात भेडसावणार्‍या हत्तीसह एमआयडीसी प्रश्नावर चर्चा होणार आहे. त्यामुळे हे प्रश्न मांडण्यासाठी दोडामार्ग येथील जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन सामंत यांनी यावेळी केले.