पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या दौऱ्याचा अन् अनधिकृत बांधकामे हटविण्याचा संबंध नाही…

19
2
Google search engine
Google search engine

रविकिरण तोरसकर ; राजकीय हेतूने गैरसमज पसरविण्याचे काम…

मालवण, ता. २७ : नौदल दिनाच्या निमित्ताने होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती यांचा मालवण दौरा आणि किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकाम हटविणे यांचा काहीही सबंध नाही. राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचे काम केले जात असल्याचे भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी पत्रकातून स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात सबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजाविल्या आहेत. या नोटीसा लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या एका नागरिकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने बजाविण्यात आल्या आहेत. संबंधित नागरिकाने पर्यटन व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामामुळे आपल्या व्यवसायावर तसेच वहिवाट याच्यावर बाधा येत असल्याने संबंधित अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालवण भेट याचा दुरान्वये सबंध नाही. काही राजकीय हेतूने प्रेरित माणसे व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यांच्यामध्ये गैरसमज पसरवून वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे या विषयातील तक्रारदार नागरिक हा मविआ आघाडीचा पदाधिकारी आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा नौदल दिनानिमित्त होणारा मालवण दौरा ऐतिहासिक असून मालवण तसेच सिंधुदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट मध्ये होणाऱ्या पुतळ्यामुळे पर्यटनाचे नवीन ठिकाण निर्माण होत आहे. त्याचा फायदा स्थानिक व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यानांच होणार आहे. त्यामुळे मच्छीमार व पर्यटन व्यवसायिकांनी टोकाची भूमिका घेऊ नये तसेच कुठल्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन श्री. तोरसकर यांनी केले आहे.
त्याचबरोबर तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन सोबत संबंधित विषयात चर्चा सुरू आहे. लवकरच तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांची मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिकांसोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांनी आंदोलनात्मक पवित्रा न घेता प्रशासनाशी संवाद साधावा व त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहितीही श्री. तोरसकर यांनी दिली आहे.