जलक्रीडेसाठी मालवणात जाण्यास गोव्यातील आमदाराचा पर्यटकांना विरोध…

14
2
Google search engine
Google search engine

स्थानिक व्यावसायिक आक्रमक; कारवाईचे आदेश थांबवा, भेट घेऊन चर्चा करू, निलेश राणे…

मालवण,ता.२८: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सिंधुदुर्गात, मालवणात जलक्रीडेसाठी जाण्यास गोव्यातील कलंगुट येथील आमदाराकडून मज्जाव केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज येथील काही जलक्रीडा व्यावसायिकांनी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेत लक्ष वेधले. यासंदर्भात श्री. राणे यांनी संबंधित आमदाराशी संपर्क साधत कारवाईचे आदेश थांबवावेत. ४ नोव्हेंबरला मी आपली भेट घेऊन चर्चा करेन तसेच मालवणातील व्यावसायिकांच्या भेटीस तुम्हाला आमंत्रित करू असे स्पष्ट केले.

सध्या पर्यटन हंगाम सुरू असताना कलंगुट येथील स्थानिक आमदाराने मालवणात जलक्रीडेसाठी येणाऱ्या पर्यटकांना मज्जाव केला आहे. गोव्यातून पर्यटक अन्य ठिकाणी जाता कामा नये अशा सूचना त्यांनी प्रशासनास, पोलिसांना दिल्या आहेत. प्रत्यक्षात येथील पर्यटकांचे ऑनलाईन बुकिंग असताना आणि त्यांचे वास्तव्य गोव्यात असताना या पर्यटकांना येथे येण्यास मज्जाव करणे चुकीचे असल्याचे येथील जलक्रीडा व्यावसायिकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे येथील पर्यटनावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यासंदर्भात येथील जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत श्री. राणे यांनी गोव्यातील संबंधित आमदाराशी फोनवरून संपर्क साधत चुकीच्या पद्धतीने कारवाईचे दिलेले आदेश थांबवावेत असे सांगितले. कोणताही पर्यटक कोठेही पर्यटनासाठी, जलक्रीडेसाठी जाऊ शकतो. त्यांच्यावर बंधन घालणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात मी ४ नोव्हेंबरला आपली भेट घेऊन चर्चा करेन तसेच शक्य असल्यास येथील व्यवसायिकांशी चर्चा करण्यासाठी आमंत्रित करू असे सांगितले. येथील व्यावसायिकांच्या आपण पाठीशी असल्याचे आश्वासन श्री. राणे यांनी जलक्रीडा व्यावसायिकांना दिले.

येथील जलक्रीडा व्यावसायिकांनी संघटित होऊन एकत्र आल्यास या परिस्थितीवर मात करता येईल त्यादृष्टीने सर्व व्यावसायिकांनी एकत्र यावे असे आवाहन अन्वेषा आचरेकर यांनी केले आहे.