दामोदर तोडणकर यांचे भर समुद्रात उपोषण सुरू…

40
2
Google search engine
Google search engine

अनधिकृत बांधकामा विरोधात आक्रमक; झाडे तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा….

मालवण,ता.०७: येथील किनारपट्टी वरील अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून न झाल्याने बंदर जेटी येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी आज सकाळपासून येथील समुद्रात उपोषण सुरू केले आहे.
येथील बंदर जेटी परिसरातील श्री. तोडणकर यांचे निवास स्वरूपातील बांधकाम अतिक्रमण असल्याचे सांगत प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ, सिंधुदुर्ग ओरोस यांच्या नोटीसी नंतर जमीनददोस्त करण्यात आले. याठिकाणी असलेली झाडेही तोडण्यात आली. हे बांधकाम हटवित असताना किनारपट्टीवरील अन्य ६७ बांधकाम धारकांची यादी समोर आली होती. त्यांनाही अनधिकृत व अतिक्रमण बांधकाम तोडण्याबाबत ७ दिवस मुदतीच्या नोटीसा प्रशासनाने बजावण्यात आल्या होत्या. नोटीस कालावधी संपल्यावर अन्य बांधकामे बंदर विभाग अथवा प्रशासन यंत्रणेने हटविण्याची कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र याची कार्यवाही न झाल्यानेच आपण प्रशासनाच्या विरोधात समुद्रात बसून उपोषण छेडले आहे. बंदर विभागाने आकसापोटी, सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केली आहे. एका बंदर अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली. त्याला पैसे न दिल्याने बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात आली.
नोटीसा बजावण्यात आलेली बांधकामे न पाडल्याने तसेच बंदर जेटी समोरील झाडे जमीनदोस्त करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे. आंदोलनाची पुढील दिशा मालवण बंदर विभाग अथवा तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आत्मदहन करणार असल्याचे श्री. तोडणकर यांनी स्पष्ट करत या सर्वाला प्रशासनच जबाबदार असेल असेही त्यांनी सांगितले.