आंबोली घाटाच्या कामात अपहार, ठेकेदार आणि अधिकारी मालामाल…

10
2
Google search engine
Google search engine

बबन साळगावकर; गुन्हे दाखल करुन प्रॉपर्टीची चौकशी करा, पोलिसांकडे मागणी…

सावंतवाडी,ता.१३: आंबोली घाटातील कामे निकृष्ट होण्यास अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे होणार्‍या अपघाताचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा, अशी मागणी आज येथे माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलिसांकडे केली. दरम्यान याबाबत तात्काळ वरिष्ठांशी चर्चा करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा या प्रकाराच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिस निरिक्षकांना दिला.

आंबोली घाटातील रस्ते कोट्यावधी खर्च करुन दरवर्षी खराब होतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच या कामावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या प्रकाराचा ठपका ठेवून संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज येथील पोलिस निरिक्षक अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्या ठिकाणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपल्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे वरिष्ठांकडे हे प्रकरण पाठविले जाईल, असे श्री. अधिकारी यांनी सांगतले. दरम्यान या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. कामाच्या नावावर लाखो रुपये उकळले जात आहे. त्यातून अधिकारी आणि ठेकेदार मालामाल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा, अशी मागणी यावेळी साळगावकर व सहकार्‍यांकडुन करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, रवी जाधव, उमेश कोरगावकर, आसिफ बिजली, प्रदीप ढोरे, सुधीर पराडकर, उमेश खटावकर, सिताराम गावडे, बंटी माठेकर, विजय पवार, तौकीर शेख आदी उपस्थित होते.