रात्री अकरा नंतर अनावश्‍यक फिरणाऱ्यांवर कारवाई…

15
2
Google search engine
Google search engine

अमित यादव ; परप्रांतीय कामगारांची नोंदणी बंधनकारक…

कणकवली, ता.५ : शहरात रात्री अकरानंतर अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्‍तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल असा इशारा कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आज दिला. तर घरफोड्या, चोरी आदी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय कामगारांची नोंदणी बंधनकारक असल्‍याचे ते म्‍हणाले.

कणकवली तालुक्‍यात गेल्‍या काही दिवसांत घरफोडीचे प्रकार घडले. तर शहरात आलेल्‍या कामगाराचे अपहरण करून लूट करण्याचीही घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्‍या जात आहेत. त्‍याबाबत बोलताना श्री.यादव म्‍हणाले की, शहरात रात्री उशिरापर्यंत काही स्टॉल, टपऱ्या उशिरापर्यंत चालू असतात. त्या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरुण व परप्रांतीय कामगार फिरत असल्याचे आढळून येत आहेत. आतापर्यंत त्यांना समज देवून सोडण्यात येत आहे. तसेच कणकवली शहरात बुलेट व अन्य दुचाकीस्वार मोठमोठे आवाजाने रात्री अपरात्री वाहने फिरवून शांतता भंग करत नागरिकांना त्रास दिला जात आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे युवक रात्री अपरात्री शहरातील कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रात्री ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई केली जाणार आहे.