काही दिवसात फणसवडे सारख्या दुर्गम गावात मोबाईल “खणखणणार”…

186
2
Google search engine
Google search engine

संदीप गावडेंचा पुढाकार; अनेक अडचणीनंतर अखेर टॉवरचे भूमिपूजन

सावंतवाडी,ता.१७: आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम अशा फणसवडे गावात अनेक वर्षांनी काही दिवसात मोबाईलची रिंग खणखणखणार आहे. आज त्या ठीकाणी होणाऱ्या टाॅवरचे भूमिपूजन करण्यात आले. गेली अनेक वर्षे हा गाव रेंजपासून वंचित होता. आता मात्र त्या ठिकाणी बीएसएनएलची रेंज मिळणार आहे. यासाठी भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी विशेष प्रयत्न केले. या टॉवरच्या कामाचे भूमिपूजन श्री.गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, सरपंच सौ. अश्विनी कसले, उपसरपंच संदीप पाटील, दशरथ गावडे, भिवा सावंत, कृष्णा गावडे, बाळा गावडे, रामकृष्ण गावडे, नामदेव गावडे, अमित गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वानाथ गावडे, उत्तम नाईक, गोविंद नाईक, सत्यवान गावडे, अंकुश गावडे, सचिन गावडे, प्रभाकर गावडे, गोपीनाथ गावडे, उमेश गावडे, प्रकाश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यात सर्व गावात मोबाईल यंत्रणा पोहोचली असली तरी दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे फणसवडे गाव गेली अनेक वर्षे मोबाईल सेवेपासून वंचित राहिला होता. जमिनीचा आणि परवानगीचा मुद्दा वारंवार डोके वर काढत असल्यामुळे त्या ठिकाणी टॉवर घालण्या साठीची बाब ग्रामस्थांनी संदीप गावडे यांच्या नजरेस आणून दिली. यावेळी त्यांनी गावात टॉवर उभारण्याचा पुढाकार घेतला. यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न त्यांनी सुरू केले. परंतु ती जागा इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी टॉवर बांधता येणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. परंतु त्याला फाटा देण्यासाठी श्री. गावडे यांनी जिल्ह्यातील अन्य किती टाॅवर इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये आहेत का? याबाबत माहिती घेतली यात अनेक टॉवर इकोसेन्सिटिव्हमध्ये असल्याचे पुढे आले ती माहिती पुढे करून श्री. गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यां कडून परवानगी मिळवली. त्यानंतर पुन्हा सर्वेचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी पदरमोड करून सर्व्हेसाठी आवश्यक असलेली फी त्यांनी भरली. व हा प्रश्न तब्बल दीड ते दोन वर्ष पाठपुरावा करून सोडवला. आज गावातील श्री देव मल्लनाथ देवाच्या जत्रोसाच्या निमित्ताने या टॉवरच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे गावातील ग्रामस्थ, चाकरमानी आणि विशेषतः माहेरवाशींणींनी याबाबत समाधान व्यक्त केले.

याबाबत श्री. गावडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या ठिकाणी रेंज येण्यापूर्वी, खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना फोन लावण्यासाठी तब्बल दोन किलोमीटर जावे लागत होते. पावसात, उन्हात-तान्हात हे ग्रामस्थ एका झाडाखाली उंचावर बसून फोन किंवा चॅटिंग करत होते. त्याही पलीकडे कोरोना काळात वॅक्सिनेशन करण्यासाठी आलेल्या टीमला गावात रेंज मिळत नसल्यामुळे ओटीपी येण्यास अडचणी निर्माण येत होत्या. यावेळी पूर्ण गाव दोन किलोमीटर लांब असलेल्या एका उंच ठिकाणी बसून त्या ठिकाणी वॅक्सिनेशन करण्यात आले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन गावात टॉवर झाला पाहिजे, असा आपण चंग बांधला आणि टॉवर उभारण्यासाठी पाठपुरावा केला. यासाठी मला सर्व यंत्रणेने व विशेषतः पालकमंत्र्यांनी सहकार्य केले. त्यामुळे काही महिन्यातच आता गावात रेंज येणार आहे असा दावा श्री गावडे यांनी केला